Pune Crime News : तो चिमुकला पुन्हा आईच्या कुशीत विसावला, अपरणकर्त्यांनीच आणून सोडले….

एमपीसी न्यूज :  हडपसर परिसरातील गाडीतळ पुलाखालून दोन दिवसांपूर्वी एक वर्षे चिमुरड्याचे अपहरण करण्यात आले होते.  आईच्या कुशीत झोपलेल्या चिमुरड्याला अज्ञात महिलांनी उचलून नेले होते. सोमवारी पहाटेच्या सुमारास हा प्रकार घडला होता. तो चिमुकला पुन्हा एकदा आईच्या कुशीत विसावला असून आज पहाटे कुणीतरी त्याला ज्या ठिकाणाहून अपहरण केले तिथेच आणून सोडले आहे. हा चिमुकला सापडल्यामुळे आईच्या डोळ्यात आनंदाचे अश्रू वाहू लागले. 

 

सोमवारी पहाटेच्या सुमारास या चिमुकल्या चे अपहरण झाले होते. पतीसोबत वाद झाल्यामुळे फिर्यादी शर्मिला निलेश काळे या हडपसर येथील गाडी पुलाखाली काही ओळखीच्या महिलांसोबत राहत होती. सोमवारी पहाटेच्या सुमारास त्या गाढ झोपेत असताना दोन महिला पायी चालत त्या ठिकाणी आल्या आणि त्यांनी फिर्यादी यांच्याजवळ झोपलेल्या त्यांच्या एक वर्षाच्या मुलाला उचलून घेऊन गेल्या.

 

काही वेळा नंतर हा सर्व प्रकार उघडकीस आल्यानंतर फिर्यादीनी संपूर्ण गाडीतळ परिसर पिंजून काढला परंतु बाळ सापडले नाही. त्यानंतर त्यांनी हडपसर पोलीस स्टेशन गाठत बाळ हरवल्याची तक्रार दिली. हडपसर पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल करत या मुलाचा शोध सुरू केला होता. अपहरणाचा हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैदही झाला होता. दरम्यान त्यानंतर आज या लहानग्याला अपहरणकर्त्यांनीच या परिसरात पुन्हा आणून सोडले असावे. हडपसर पोलीस या बाबत अधिक तपास करत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.