Dehuroad News : पोलिसांना टीप देत असल्याच्या संशयावरून कोयत्याने वार

एमपीसी न्यूज – दोन नंबर धंद्याची पोलिसांना टीप देत असल्याच्या संशयावरून दोघांनी मिळून दोघांना बेदम मारहाण केली. त्यानंतर कोयत्याने एकावर वार करून गंभीर जखमी केले. ही घटना रविवारी (दि. 28) दुपारी शिवाजीनगर, देहूरोड येथे घडली.

बाबू खाजाप्पा मुगली (वय 25, रा. शिवाजीनगर, देहूरोड), दयामण्णा शिवपुरे अशी जखमींची नावे आहेत. याबाबत मुगली यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार द-या साळवे, विजय (पूर्ण नाव माहिती नाही, दोघे रा. शिवाजीनगर, देहूरोड) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी मुगली यांचा मावस भाऊ शिवपुरे हा आरोपींच्या दोन नंबर धंद्याची टीप पोलिसांना देतो, असा आरोपींना संशय होता. त्यावरून रविवारी दुपारी साडेतीन वाजता आरोपींनी शिवापुरे यांना शिवीगाळ करून हाताने मारहाण केली.

आरोपी द-या हा चाकू घेऊन शिवपुरे यांच्या अंगावर धावून आला. त्यामुळे फिर्यादी मुगली भांडण सोडविण्यासाठी गेले. त्यावेळी आरोपी विजय याने रिक्षातील लोखंडी कोयता काढला आणि मुगली यांच्या डोक्यात वार केले. यामध्ये मुगली गंभीर जखमी झाले. देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.