Chikhali : आजी-आजोबांकडे जाण्यासाठी त्याने चोरली दुचाकी

एमपीसी न्यूज – बारामती येथे राहणा-या आजी-आजोबांकडे जाण्यासाठी चिखली येथील एका अल्पवयीन मुलाने मित्रांच्या मदतीने दुचाकी चोरली. मात्र, आजी-आजोबांकडे पोहोचण्याआधीच तो मित्रांसह पोलिसांच्या जाळ्यात अडकला.

याप्रकरणी चिखली पोलिसांनी 17 वर्षीय नातवासोबत त्याच्या दोन साथीदारांना ताब्यात घेण्यात आले आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अल्पवयीन मुलगा आईसोबत चिखली येथे राहतो. त्याचे आजी-आजोबा बारामती येथे राहतात. मागील काही वर्षांपूर्वी त्याच्या वडिलांचे निधन झाले आहे. त्याला त्याच्या आजी-आजोबांची वारंवार आठवण येत होती. त्यामुळे त्याने आईच्या परस्पर आजी-आजोबांना भेटण्याचा बेत आखला. आजी-आजोबांना भेटायला जाण्यासाठी त्याने दुचाकी चोरण्याची शक्कल लढवली.

मित्रांच्या मदतीने त्याने चिखली परिसरातून एक दुचाकी चोरली. त्या चोरीच्या दुचाकीवरून दोन्ही मित्रांसोबत तो बारामतीला जाण्यासाठी निघाला असता चिखली पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे असलेल्या दुचाकीबाबत विचारणा केली असता त्याने ती चोरीची असल्याचे सांगितले. यावरून हा प्रकार उघडकीस आला. याचा अधिक तपास चिखली पोलीस करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.