Talavade News : 100-200 रुपयांसाठी तुम्ही विनाकारण त्रास देता म्हणत वाहतूक पोलिसावर चप्पल भिरकावली

विनामास्क फिरणाऱ्या तरुणाची वाहतूक पोलिसाला दमबाजी

एमपीसी न्यूज – विनामास्क जाणाऱ्या एका तरुणाला वाहतूक पोलिसांनी अडवले. त्याला मास्क लावण्याबाबत विचारणा केली असता तरुणाने वाहतूक पोलिसाला दम दिला. 100-200 रुपयांसाठी तुम्ही आम्हाला अडवून विनाकारण त्रास देता. मी येलवाडी येथीलच आहे.

तुम्ही या चौकात कशी नोकरी करता ते बघतो असे म्हणून त्याने चप्पल वाहतूक पोलिसाच्या दिशेने भिरकावली. ही घटना रविवारी (दि. 17) सायंकाळी सहा वाजता तळवडे गावठाण चौक येथे घडली.

विशाल लहानु ढोकळे (वय 29, रा. येलवाडी, ता. हवेली, जि .पुणे. मुळ रा. खडकवाडी, तालुका पारनेर, जि. अहमदनगर) असे गुन्हा दाखल झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल नारायण सोमवंशी यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी पोलीस कॉन्स्टेबल नारायण सोमवंशी हे तळवडे वाहतूक विभागात नेमणुकीस आहेत. रविवारी सोमवंशी तळवडे गावठाण चौकात कर्तव्य बजावत होते. सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास आरोपी विशाल दुचाकीवरून आला.

विशाल याने तोंडाला मास्क लावला नव्हता म्हणून पोलिसांनी त्याला हातवारे करून थांबण्यास सांगितले. मास्क का घातला नाही अशी विचारणा पोलिसांनी केली असता विशालने पोलिसांना उद्धटपणे उत्तर देण्यास सुरुवात केली.

‘मी मास्क घालणार नाही. तुम्ही 100-200 रूपयासाठी आम्हा लोकांना अडवुन विनाकारण त्रास देत आहात. मी मास्क घालणार नाही. तुम्हाला जे करायचे आहे ते करा असे म्हणत त्याने फिर्यादी यांना शिवीगाळ केली. ‘मी येलवाडी येथीलच आहे.

तुम्ही या चौकात कशी नोकरी करता ते मी बघतो, असे म्हणून त्याने पायातील चप्पल काढून पोलीस कॉन्स्टेबल सोमवंशी यांच्या दिशेने भिरकावली. याबाबत विशाल विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.