मंगळवार, ऑक्टोबर 4, 2022

Lonikand News : जादूटोणा करत असल्याची पोलिसात तक्रार देण्याची धमकी देऊन उकळले पुजाऱ्याकडून पैसे, दोघांना अटक

एमपीसी न्यूज : तुम्ही भोंदूगिरी करता, जादूटोणा करता अशी तक्रार पोलिसात देतो अशी धमकी देऊन पुजाऱ्याकडून खंडणी उकळणाऱ्या तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लोणीकंद पोलीस स्टेशनच्या हद्दीत हा प्रकार घडला.

सोनल मगर, विनायक अधिकराव लावंड आणि अभिजीत गोपीचंद दरेकर अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यातील दोघांना अटक करण्यात आली आहे. पुजारी अर्जुन आतकर (वय 52) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे पुजारी असून लोणीकंद पोलिस स्टेशनच्या हद्दीतील सोमेश्वर नगर आई यल्लमा निवास येथे राहतात.

आरोपींनी 29 सप्टेंबर ते 3 डिसेंबर या कालावधीत फिर्यादीच्या घरी येऊन तसेच मोबाईलद्वारे संपर्क साधून “तुम्ही भोंदुगिरी करता, जादूटोणा करता, अशी मी तुमच्या विरोधात पोलिसांकडे तक्रार करणार आहे, पोलीस तुम्हाला अटक करतील” जर पोलिसांकडे तक्रार करायची नसेल तर तुम्ही मला पैसे द्या, असे म्हणून वेळोवेळी रोख एक लाख रुपये आणि सोन्याची अंगठी फिर्यादीकडून घेतली.

त्यानंतरही बदनामी करण्याची भीती दाखवून आणि पोलिसांकडे तक्रार करण्याची धमकी देऊन आणखी पैशांची मागणी केली. यानंतर फिर्यादीने लोणीकंद पोलीस ठाण्यात या प्रकरणी तक्रार दिली आहे.

पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.

spot_img
Latest news
Related news