Pimpri : मांजा विक्री करणा-यांवर कडक कारवाई करणार – आयुक्त हर्डीकर

आरोग्य निरीक्षकांकडे दिली जाणार जबाबदारी 

एमपीसी न्यूज – मांजा हा नागरिक, पक्षांसाठी अतिशय घातक आहे. त्यामुळे चायनीज, घातक मांज्याची कोणी विक्री करु नये. मांजा विक्री करणा-यांवर महापालिका कारवाई करणार आहे. त्याची जबाबदारी आरोग्य निरीक्षकाकडे दिली जाणार असल्याचे, महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी आज (सोमवारी) पत्रकारांशी बोलताना सांगितले. 

पतंगाचा मांजा गळ्याला अडकल्याने दुचाकीवरून जात असलेल्या डॉ. कृपाली निकम यांचा रविवारी दुर्दैवी मृत्यू झाला. रविवारी (दि. 7) सायंकाळी सातच्या सुमारास कासारवाडी येथून जात असताना अचानक गळ्याला अडकलेल्या मांजामुळे त्यांचे दुचाकीवरील नियंत्रण सुटले आणि त्या खाली पडल्या. पण तोपर्यंत मांजाने त्यांच्या गळ्याला कापले होते. त्यात त्यांचा मृत्यू झाला.

मांजा विक्रीबाबत आयुक्त श्रावण हर्डीकर यांना विचारले असता ते म्हणाले, ‘मांजा गळ्याला अडकून डॉक्टर तरुणीचा मृत्यू झाल्याची अतिशय गंभीर घटना घडली आहे. चायनीज मांज्या अतिशय घातक आणि जीवघेणा आहे.

त्यामुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. तसेच काहीजण गंभीर जखमी झाले आहेत. या मांजाच्या विळख्यातून पशु पक्षीसुद्धा सुटत नाहीत. शहरात त्याचा वापर होता कामा नये. कोणीही चायनीज, घातक मांज्याचा वापर करु नये. चायनीज मांजा वापरणा-यांवर महापालिका धडक कारवाई करणार आहे. त्याची जबाबदारी आरोग्य निरीक्षकाकडे दिली जाणार आहे. प्लास्टिकवरील कारवाईसारखी माज्यांवर देखील कडक कारवाई करण्यात येणार आहे’.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.