Bhosari : गोळीबार करून लूटमार करणा-या सराईत टोळी प्रमुखाला बेड्या

एमपीसी न्यूज – मोबाईल स्पेअर पार्ट विकणा-या विक्रेत्याला दमबाजी करून लुटले. तसेच त्याने पैसे देण्यास नकार दिल्याने हवेत गोळीबार केला. या प्रकरणातील टोळीच्या प्रमुखास पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखा युनिट एकच्या पोलिसांनी अटक केली.

गुरुदत्त उर्फ बाबा अशोक पांडे (रा. नारायण रसाळ चाळ, मंडई जवळ, भोसरी) असे अटक केलेल्या टोळी प्रमुखाचे नाव आहे. पोलिसांनी यापूर्वी शिवाजी खरात, विकास जैसवाल या दोघांना अटक केली आहे. याप्रकरणी अक्षय अंगत भांडवलकर (वय 21, रा. धावडे वस्ती, भोसरी) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक उत्तम तांगडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, अक्षय हा मोबाईलचे स्पेअर पार्ट विक्रीचे काम करतो. पुणे-नाशिक महामार्गवर भोसरी येथे अंकुशराव लांडगे नाट्यगृहाच्या समोर अक्षय त्याचे दुकान मांडतो. 11 ऑगस्ट रोजी पाच आरोपी दुपारी त्याच्या दुकानासमोर कारमधून आले. ‘तुझ्याकडे जे असेल ते काढून दे, आम्ही इथले भाई आहोत’ असे म्हणून आरोपींनी अक्षय यांना दमबाजी केली. अक्षय यांनी आरोपींना पैसे देण्यास विरोध केला. त्यावरून चिढलेल्या आरोपी सनी याने पिस्तुलातून हवेत गोळीबार केला. त्यानंतर अक्षय यांच्या गळ्यातील 60 हजार रुपये किमतीची दोन तोळ्यांची सोन्याची साखळी आणि दुकानाच्या पेटीतून 2 हजार 450 रुपये जबरदस्तीने घेऊन गेले.

या गुन्ह्याचा तपास भोसरी पोलिसांसह गुन्हे शाखा युनिट एकचे पोलीस करीत आहेत. गुन्हे शाखा युनिट एकचे पोलीस भोसरी परिसरात फरार असलेल्या आरोपींचा शोध घेत असताना पोलीस कर्मचारी गणेश सावंत यांना माहिती मिळाली की, वरील गुन्ह्यातील सराईत गुन्हेगार बाबा पांडे भोसरी स्मशानभूमी जवळ येणार आहे. त्यानुसार पोलिसांनी स्माशानभूमी परिसरात सापळा रचून बाबा पांडे याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने गुन्हा केल्याचे कबूल केले.

आरोपी बाबा पांडे हा पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. त्याची भोसरी परिसरात टोळी आहे. तो त्या टोळीचा प्रमुख आहे. बाबा पांडे टोळीचे आणि भोसरी भागातील ज्ञानेश्वर लांडगे याच्या टोळीचे वर्चस्वावरून वारंवार भांडण होते. वर्चस्वाच्या कारणावरून 2014 मध्ये बाबा पांडे याने प्रतीक तापकीर, सनी गुप्ता यांच्या मदतीने ज्ञानेश्वर लांडगे टोळीतील अक्षय काटे याचा खून केला. याबाबत भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. बाबा पांडे याच्यावर हाणामारी, चोरी, बेकायदेशीर शस्त्र बाळगणे असे एकूण सहा गुन्हे दाखल आहेत.

ज्ञानेश्वर लांडगे हा किशोर झेंडे याच्या खुनाच्या गुन्ह्यात 2015 पासून कारागृहात होता. तो नुकताच कारागृहातून सुटला होता. त्याला मारण्यासाठी व स्वतःच्या रक्षणासाठी बाबा पांडे याने दोन पिस्तूल आणि चार काडतुसे स्वतःजवळ बाळगली. बेकायदेशीर शस्त्र बाळगल्याप्रकरणी त्याला गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने जुलै 2019 मध्ये अटक केली होती.

ही कारवाई पोलीस आयुक्त आर के पद्मनाभन, सह पोलीस आयुक्त प्रकाश मुत्याळ, अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त सुधीर हिरेमठ, सहाय्यक आयुक्त राजाराम पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक उत्तम तांगडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश पाटील, पोलीस उपनिरीक्षक काळुराम लांडगे, पोलीस कर्मचारी गणेश पाटील, विजय मोरे, प्रवीण पाटील, मनोजकुमार कमले यांच्या पथकाने केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
You might also like