Nigdi News : आहार, विहार, विश्रांती यांतून आरोग्यप्राप्ती – प्रा. शैलजा सांगळे

एमपीसी न्यूज – “जागतिक आरोग्य संघटनेच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार आहार, विहार, विश्रांती यांतून आरोग्यप्राप्ती होते!” असे प्रतिपादन ज्येष्ठ व्याख्यात्या प्रा. शैलजा सांगळे यांनी व्यक्त केले.

मधुश्री कला आविष्कार आणि प्राधिकरण ज्येष्ठ नागरिक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने निगडीतील आयोजित तीन दिवसीय मधुश्री व्याख्यानमालेत ‘ताणतणावरहित जीवन’ या विषयावरील अंतिम पुष्प गुंफताना प्रा. शैलजा सांगळे बोलत होत्या. लायन्स क्लब इंटरनॅशनल (कौशल्य विभाग) चेअरपर्सन अशोक येवले अध्यक्षस्थानी होते.

कलारंग प्रतिष्ठानचे अध्यक्ष अमित गोरखे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते; तर प्राधिकरण ज्येष्ठ नागरिक संघाच्या अध्यक्ष चांदबी सय्यद, मधुश्रीचे कार्याध्यक्ष सलीम शिकलगार, सचिव राजेंद्र बाबर यांची व्यासपीठावर उपस्थिती होती.

प्रा. शैलजा सांगळे पुढे म्हणाल्या की, “आयुष्यात ताणतणाव कोणालाही चुकलेले नाहीत. त्यामुळे आनंदाला जागा राहिली नाही. साहजिकच त्यामुळे अनेक आजार अन् व्याधी उद्भवतात. सर्वसाधारणपणे प्रकृतीच्या तक्रारी, विसंवाद, एकटेपणा किंवा अपयश आणि वर्तमानात जगण्याची मानसिकता नसणे या चार प्रमुख कारणांमुळे ताणतणाव निर्माण होतात. चुकीचा आहार, व्यायामाचा अभाव आणि पुरेशी विश्रांती न घेणे यामुळे बालवयात लठ्ठपणा तर तारुण्यात हृदयविकारासारखे गंभीर आजार होतात.

त्याचप्रमाणे मानापमानाच्या भ्रामक कल्पनांमुळे मानसिक स्वास्थ्य बिघडते. विचार, कृती, वर्तन, व्यक्तिमत्त्व आणि चारित्र्य अशी मानवी जीवनाची साखळी असते. टीकात्मक स्वभाव, तुलना यामुळे ताणतणावांमध्ये वाढ होते. शरीराच्या व्यायामाइतकाच मनाचा व्यायाम महत्त्वाचा असतो. चोवीस तासांच्या कालावधीत सुमारे साठ हजार विचार मनात येतात. त्यापैकी नकारात्मक विचारांची संख्या जास्त असते; परंतु प्रयत्नपूर्वक मनाला सकारात्मक विचारांची सवय लावणे गरजेचे असते.

मानवी जीवन हे सुख-दु:खाने भरलेले असते म्हणून अपयशाने लगेच निराश होऊ नये. छंदांमुळे नैराश्यावर मात करता येते. नवनिर्मितीमुळे इंडार्फीन हे रसायन मेंदूत स्त्रवते अन् माणसाची वृत्ती प्रसन्न राहते. ‘जे होते ते बऱ्या करता होते!’ या मंत्राच्या साहाय्याने कोणत्याही संकटातून बाहेर पडता येते. भूतकाळातील दु:खद प्रसंग आणि भविष्यकाळातील चिंता यामुळे माणूस वर्तमानकाळ खराब करीत असतो. गतजीवनातील चांगल्या घटना स्मरणात ठेवून भविष्याची अनावश्यक काळजी न करता वर्तमानकाळातील प्रत्येक क्षण समरसून जगा. पाण्यासारखे प्रवाही बनून आपल्या आनंदाच्या वाटा शोधत जगायला शिका!” विविध संदर्भ, शेरोशायरी अन् कविता, किस्से उद्धृत करीत प्रा. शैलजा सांगळे यांनी आपल्या विषयाची मांडणी केली.

माधुरी ओक यांनी प्रास्ताविकातून, “सकलांच्या कलागुणांचा विकास व्हावा म्हणून कार्यरत असलेल्या मधुश्री कला आविष्कारच्या व्याख्यानमालेने तपपूर्ती साध्य केली, या आनंदाचे श्रेय सर्वांना आहे!” अशा भावना व्यक्त केल्या. अमित गोरखे यांनी, “ऑनलाईन शिक्षण पद्धतीमुळे विद्यार्थी मोबाईलच्या आहारी गेले आहेत. त्यामुळे बालक आणि तरुण आकर्षित होतील अशा व्याख्यानमालांचे आयोजन करण्यात यावे!” अशी अपेक्षा व्यक्त केली.

अशोक येवले यांनी अध्यक्षीय मनोगतातून, “समजणे, उमजणे, सराव आणि कसोटी या चार टप्प्यांमधून कौशल्यप्राप्ती होते!” असे विचार मांडले. अजित देशपांडे, राज अहेरराव, उज्ज्वला केळकर यांनी मान्यवरांचे परिचय करून दिले. राधिका बोर्लीकर, रमेश वाकनीस, वर्षा बालगोपाल, प्रदीप गांधलीकर, शरद काणेकर, सुप्रिया कुलकर्णी यांनी संयोजनात सहकार्य केले. अश्विनी कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले. विनायक गुहे यांनी आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.