Health Minister’s Appeal : राज्यात 5 ते 6 दिवस पुरेल एवढाच रक्तसाठा ; रक्तदान करण्याचं राजेश टोपेंचे आवाहन

एमपीसी न्यूज – राज्यात 5 ते 6 दिवस पुरेल एवढाच रक्तसाठा उपलब्ध आहे. त्यामुळे नागरिकांनी मोठ्या प्रमाणात रक्तदान करावं, असे आवाहन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केले आहे.

जालन्यात पत्रकारांशी ते बोलत होते मंत्री टोपे म्हणाले, लॉकडाऊनच्या काळात रक्तदानाचे प्रमाण कमी झाल्यामुळे रक्तसाठ्यावर त्याचा मोठा परिणाम झाला आहे. सध्या आता पाच ते सहा दिवसच पुरेल एवढाच रक्तसाठा राज्यात उपलब्ध आहे.

येत्या 12 डिसेंबरला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा वाढदिवस आहे. त्यानिमित्त तरूण वर्गानं रक्तदान करण्याचं आवाहन टोपे यांनी या वेळी केलं आहे.

राज्यातील राजकीय, धार्मिक, सामाजिक संस्था व गृहनिर्माण सोसायटी यांनी कोरोनाविषयक काळजी घेऊन छोट्या- छोट्या रक्तदान शिबीरांचे आयोजन करावे. स्वैच्छिक रक्तदात्यांनी देखील नजीकच्या रक्तपेढीमध्ये जाऊन रक्तदान करावे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रक्तपेढ्यांमार्फत आवश्यक त्या तपासणी चाचण्या व प्रतिबंधक उपाययोजना करुन रक्त संकलन करण्यात येणार आहे. कोरोनाच्या काळात रुग्णांना जीवनदान देण्याकरिता सर्वांनी पुढे येऊन दर तीन महिन्यांनी रक्तदान करावे, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी म्हटलं.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.