Maharashtra Political Crisis : बहुमत चाचणी विरोधातील याचिकेवर पाच वाजता सुनावणी – सुप्रीम कोर्ट

एमपीसी न्यूज – राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आज बहुमत सिद्ध करण्यासाठी पत्र पाठवले आहे. संख्याबळ कमी असणाऱ्या मविआ सरकारने यावर पर्याय म्हणून सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे. बहुमत चाचणी विरोधातील शिवसेनेच्या याचिकेवर आज (दि. 29 जून) संध्याकाळी 05 वाजता सुप्रीम कोर्टकडून तातडीने सुनावणी करण्यात येणार आहे. सुप्रीम कोर्टाने तातडीने सुनावणी घ्यावी असा युक्तीवाद शिवसेनेच्या वतीने अभिषेक मनु सिंघवी यांनी केला. 

भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी काल राज्यपालांची भेट घेतली आणि सरकारच्या बहुमत चाचणीचे पत्र दिले. त्यानुसार राज्यपालांनी राज्याची विस्कळीत परिस्थिती (Maharashtra Political Crisis) पाहता त्यावर सविस्तर पत्र काढून मुख्यमंत्री ठाकरे यांना बहुमत सिद्ध करण्याबाबतचे निर्देश दिले. या पार्श्वभूमीवर उद्या विशेष अधिवेशन बोलवले असून यामध्ये शिरगणती द्वारे मविआ सरकारला बहुमत चाचणीला सामोरे जावे लागणार असल्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे.

राज्यपालांच्या या पत्रानंतर राज्यातील राजकीय घडामोडींना आता चांगलाच वेग आला आहे. शिवसेनेतील आमदारांच्या बंडखोरीमुळे (Maharashtra Political Crisis) मविआ सरकार पुरते अडचणीत आले आहे. अपुऱ्या संख्याबळाअभावी सरकार कोसळणार अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. परंतु, प्रतिकूल परिस्थितीत सुद्धा सरकारने तोंड देण्याचे ठरविले आहे.

Maharashtra Political Crisis : ‘बहुमत सिद्ध करा…’ राज्यपाल कोश्यारी यांचे मुख्यमंत्री ठाकरे यांना पत्र

बहुमत चाचणीच्या आदेशाविरोधात शिवसेनेने सरळ सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे. शिवसेनेचे प्रतोद सुनिल प्रभू यांनी राज्यपालांच्या निर्देशांविरोधात याचिका दाखल केली आहे. सुनिल प्रभू यांच्या वतीने अभिषेक मनु सिंघवी यांनी युक्तीवाद करत सुप्रीम कोर्टने यावर तातडीने सुनावणी घ्यावी अशी विनंती केली आहे.

यामध्ये तातडीने बहुमत चाचणी घेण्यावर आक्षेप नोंदवत प्रक्रिया बेकायदेशीर असल्याचे सिंघवी यांनी म्हटले आहे, तर बहुमताच्या चाचणीसाठी अधिवेशन बोलावणं हा राज्यपालांचा अधिकार आहे, त्यात कोणी ढवळाढवळ करू नये, राज्यपालाच्या अधिकारात हस्तक्षेप करणं चुकीचं ठरेल, असे शिंदे गटाचे वकील नीरज किशन कौल यांनी म्हटले आहे.

दोन्ही बाजूचे म्हणणे ऐकून न्यायधिशांनी आपापसात चर्चा केली. चर्चेअंती कोर्टे म्हणाले, आम्हाला कागदपत्रं द्यावीत. त्यावर आम्ही आज चार वाजेपर्यंत कागदपत्रांची पूर्तता करु. त्यावर शिवसेनेची बाजू मांडणारे वकील सिंघवी म्हणाले, आमच्यासाठी आजचा दिवस महत्त्वाचा आहे त्यानंतर सुनावणी झाली तर आमचं म्हणणं निरर्थक ठरेल. त्यावर न्यायाधीश सूर्यकांत यांनी आजच या प्रकरणी सुनावणी होईल, दुपारी तीन वाजेपर्यंत कागदपत्रं तयार ठेवा असे म्हटले आहे. दरम्यान, संध्याकाळी पाच वाजता या प्रकरणावर सुनावणी होईल असे कोर्टाकडून सांगण्यात आले आहे.

कोर्टाच्या आजच्या निर्णयावर महाविकास आघाडीचे अस्तित्व अवलंबून आहे, त्यामुळे कोर्टातील ही लढाई जिंकणे मविआ सरकारसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.