Pimpri : सभागृह नेत्याच्या राजीनामाच्या चर्चेला राजकीय वर्तुळात उधाण

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेचे सभागृह नेते एकनाथ पवार यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा देण्याचे निर्देश दिले असल्याची माहिती मिळत असून त्यानुसार सभागृह नेत्याने राजीनामा दिल्याची जोरदार चर्चा आज (बुधवारी) महापालिका वर्तुळात सुरु होती. तथापि, या वृत्ताला अधिकृतरित्या दुजोरा मिळाला नाही. 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भाजपचे शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप आणि  आमदार महेश लांडगे यांनी मुंबईत भेट घेतली. यावेळी महापौर, उपमहापौरांसह सर्वच पदाधिकारी बदलले असल्यामुळे सभागृह नेता देखील बदलण्याबाबत चर्चा झाली. त्यानंतर सभागृह नेते पवार यांना राजीनामा देण्याचे निर्देश दिले असल्याची, जोरदार चर्चा शहराच्या राजकीय वर्तुळात रंगली आहे. चार वाजल्यापासून महापालिका वर्तुळात याची चर्चा सुरु होती.

महापालिकेतील कारभा-यांनी सर्व नगरसेवकांना पंचवार्षिकमध्ये एक तरी पद देण्याचे धोरण निश्चित केले. त्यानुसार पालिकेच्या आर्थिक चाव्या हातात असणा-या स्थायी समितीमध्ये दोन वर्षांऐवजी नगरसेवकांना एकाच वर्षाचा कालावधी देण्यात आला. त्याच धर्तीवर सव्वा वर्षाचा कार्यकाळ संपल्यानंतर तत्कालीन महापौर नितीन काळजे आणि उपमहापौर शैलजा मोरे यांचे राजीनामे घेतले. त्यांचे उत्तराधिकारी म्हणून जाधववाडीचे प्रतिनिधित्व करणारे राहुल जाधव यांना महापौरपद तर वाल्हेकरवाडीचे प्रतिनिधित्व करणारे सचिन चिंचवडे यांची उपमहापौरपदी 4 ऑगस्ट रोजी निवड झाली. तर, सभागृह नेते एकनाथ पवार यांना तात्पुरते अभय देण्यात आले होते. आता त्यांनाही राजीनामा देण्याचे आदेश दिल्याची चर्चा आहे.

याबाबत सभागृह नेते एकनाथ पवार यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.