Lonavala : मुसळधार पावसाने लोणावळा परिसर जलमय

24 तासात 285 मिमी पाऊस

एमपीसी न्यूज – मुसळधार पावसाने लोणावळा परिसर जलमय झाला असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. लोणावळा शहरात मागील 24 तासात तब्बल 285 मिमी पाऊस झाला आहे. शनिवारी रात्रीपासून लोणावळा परिसरात पावसाचा जोर वाढल्याने सर्वत्र पाणीच पाणी झाले आहे. मुसळधार पावसाने इंद्रायणी नदीला मोठ्या प्रमाणात पूर आला आहे. 

शहरात 4 जुलैपासून संततधार पाऊस सुरु असून या पावसाने शनिवारी रात्रीपासून रौद्र रुप धारण केल्याने अवघ्या 24 तासात 285 मिमी एवढा पाऊस झाला असून पावसाचा जोर आज देखील कायम असल्याने नागरिकांना घराबाहेर पडणे मुश्कील झाले आहे. पवना धरण परिसरात मागील 24 तासात 154 मिमी पाऊस झाला असून धरणात 63.17 टक्के पाणीसाठा झाला आहे. मावळ तालुक्यातील वाडिवळे धरण 77.16 टक्के, आंद्रा धरण 78.31 टक्के तर कासारसाई धरण 81.20 टक्के भरले आहे.

मुसळधार पावसामुळे लोणावळा व मावळ भागातील ओढ्यानाल्यांना पुराचे स्वरुप आले असून धबधबे ओसंडून वाहत असल्याने नागरिकांनी कामाशिवाय घराबाहेर पडू नये. तसेच पर्यटकांनी देखील डोंगरभागातील धबधबे तसेच पर्यटनस्थळांवर जाऊ नये, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. भुशी धरण व लायन्स पाॅईंटकडे जाणार्‍या रस्त्यावरुन पाणी वाहत आल्याने त्या भागात कोणीही जाण्याचा प्रयत्न करु नये. लोणावळा शहरातील अनेक रस्ते पाण्याखाली गेल्याने त्याचा परिणाम वाहतुकीवर झाला आहे. पावसामुळे द्रुतगती महामार्ग व राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक मंदावली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.