Pimpri : पुणे, पिंपरी-चिंचवड शहरात मुसळधार पाऊस

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरात आज रविवारी सायंकाळी सहाच्या सुमारास मेघगर्जनेसह पावसाने दमदार हजेरी लावली. ऊन नसले तरी उकाड्याने हैराण झालेल्या पुणे आणि पिंपरी-चिंचवडकरांना यामुळे गारठा अनुभवता आला.  
अग्नेय अरबी समुद्र, लक्षद्वीप व पूर्व मध्य अरबी समुद्रावर कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. यामुळे कोकण गोवा व मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली. पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात आज 39.5 अंश सेल्सिअस कमाल तापमान नोंदवले गेले.

सकाळपासून शहरात ढगाळ वातावरण होते. त्यामुळे सूर्याने ढगांच्या आड दडी मारली. ऊन नसले तरी पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात उकाडा मात्र कायम होता. दुपारच्या वेळी अचानक ढग भरून आले आणि सायंकाळी सहाच्या सुमारास शहरात पावसाला सुरुवात झाली. भल्यामोठ्या उकाड्यानंतर अचानक आलेल्या पावसाचे येणे नागरिकांसाठी सुखावह होते.

पुण्यात झाडपडीच्या 15 घटना तर पिंपरी-चिंचवडमध्ये 22 घटना

कोथरुड, आपटे रोड, कर्वे नगर, गोखले नगर, शिवाजीनगर बसस्थानक, मॉडेल कॉलनी, मंगळवार पेठ, रास्ता पेठ, रविवार पेठ, बाणेर पाषाण रोड, पानमळा, ताडीवाला रोड, म.हौ.बोर्ड, येरवडा, कोरेगाव पार्क, लेन नं ७, कैलास स्मशानभूमी, लोकमान्य नगर येथे झाडपडीच्या घटना घडल्या आहेत. तर पिंपरी-चिंचवडमध्ये अग्निशामक दलाला एकूण 22 ठिकाणी झाडपडी आणि इतर घटना घडल्याचे कॉल आले होते. यापैकी सगळ्यात जास्त घटना या झापडपडीच्या होत्या.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.