Pune : अतिवृष्टीमुळे पुण्यात ‘पाणीबाणी’, शहर जलमय, अनेक घरांमध्ये पाणी, वाहने वाहून गेली,काही ठिकाणी नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवले!

एमपीसी न्यूज – गेल्या दोन दिवसांपासून शहरात रात्रीच्या सुमारास मुसळधार पाऊस पडत असून आजही रात्री 8 च्या सुमारास जोरदार पावसाला सुरुवात झाली. सलग 3 तास मुसळधार कोसळलेल्या पावसामुळे संपूर्ण शहर जलमय झाले आहे. शहरातील ओढे-नाल्यांना महापूर आला आहे. रस्त्यांवर गुडघाभर पाणी झाले असून अनेक वाहने वाहून गेल्याचे समजते. काही भागांत घरांमध्ये पाणी शिरल्याने तेथील रहिवाशांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले आहे. पावसाचा जोर कायम असल्याने परिस्थिती अधिकच चिंताजनक बनली आहे.

आज रात्री 8 च्या सुमारास विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊसला सुरुवात झाली. पाऊस इतका जोरदार होता की वाहनचालकांना समोरचे दिसणे देखील कठीण झाले होते. अनेक रस्ते जलमय झाल्याने मोठी वाहतूक कोंडी झाली. वारजे उड्डाणपुलाखाली अनेक वाहने बंद पडली. सिंहगड रस्त्यावर देखील अनेक ठिकाणी पाणी साचले. पर्वतीकडे जाणाऱ्या रस्त्यावर देखील मोठ्याप्रमाणावर पाणी साचले आहे. बिबवेवाडी, धायरी भागत अनेक ठिकाणी घरांमध्ये पाणी शिरले.

नवीनकात्रज घाटाजवळ शेजारी बोगद्याजवळ रस्ता पावसामुळे बंद झाला आहे. रस्त्यावर दरड कोसळली आहे. कात्रजला दोन तासात 55 मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून अजूनही शहरात पावसाचा जोर कायम आहे.

दांडेकर पूल झोपडपट्टीतील 134 घरांमध्ये आंबील ओढ्यातून आलेले पाणी शिरले आहे. पोलीस पाण्यात उतरून लोकांना घरातून सुरक्षित बाहेर काढत आहेत. पोलीस आणि अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहचले असून त्यांनी युद्धपातळीवर मदतकार्य सुरू केले आहे.

खडकवासला परिसरातील कोल्हेवाडीतील बिल्डिंगमध्ये पाणी दुसऱ्या मजल्यापर्यंत घुसल्याची माहिती मिळत आहे.

पुणे शहर व परिसरात जोरदार पावसामुळे काही ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाले आहे. आम्ही महापालिकेच्या सर्व यंत्रणांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे तरी कृपया नागरिकांनी काळजी करू नये तसेच कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. याच बरोबर कुणाला कुठल्याही प्रकारची मदत हवी असल्यास माझ्याशी संपर्क करावा, असे आवाहन महापौर मुक्ता टिळक यांनी केले आहे.

पुण्यात मित्र मंडळ चौकातून पर्वतीकडे जाणाऱ्या रस्त्यावर असलेल्या श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज मठाची सीमाभिंत फुटून ओढ्याचे पाणी आत शिरल्याने तेथील रहिवाशांना बाजूच्या इमारतीत हलविण्यात आले.

सासवड परिसरात मुसळधार पाऊस सुरू असल्यामुळे कऱ्हा नदीला भयंकर पूर आला असून सासवड ते नारायणपूर रस्त्यावरील वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आल्याचे वृत्त आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.