Monsoon Alert : मुंबईत संततधार पाऊस सुरु; पुढील तीन दिवस अतिवृष्टीचा इशारा

एमपीसी न्यूज : मुंबई महानगर क्षेत्रासह कोकणात जोरदार पाऊस पडत आहे.  ठाणे, नवी मुंबईत मध्यरात्रीनंतर विजांच्या कडकडासह जोरदार पाऊस झाला. दरम्यान, आजपासून 12 जूनपर्यंत राज्यातील सर्व जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. आजपासून चार दिवसांच्या काळात आपत्ती व्यवस्थापनाशी संबंधित काम करणाऱ्या सर्व यंत्रणेने, सर्व जिल्ह्याच्या प्रशासकीय यंत्रणेने सज्ज आणि सतर्क राहून काम करावे, परस्परांशी योग्य समन्वय ठेवावा असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत.

हवामान खात्याने इशारा दिल्याप्रमाणे मुंबई आणि रायगड परिसरात सध्या पावसाला सुरुवात झाली आहे. मुंबईत रात्रीपासूनच पावसाच्या सरी बरसत आहेत. शहर आणि उपनगराच्या परिसरात पहाटेपासून संततधार पाऊस पडताना दिसत आहे. हवामान खात्याने 9 ते 13 जूनदरम्यान मुंबई आणि परिसरात अतिवृष्टीचा इशारा दिला होता. हा अंदाज आता काहीप्रमाणात खरा ठरताना दिसत आहे.

हवामान विभागाकडून मुंबईसह कोकणातील सर्व जिल्ह्यांना अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. पुढील 4 दिवस हे मुंबईसाठी धोक्याचे असणार आहे. या काळात 300 मिलिमीटहून जास्त पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

रायगड जिल्ह्यातही हायअलर्ट जारी करण्यात आला आहे. 10 आणि 11 जूनला रायगड जिल्ह्यात सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे स्थानिक प्रशासन सतर्क झाले आहे. जिल्ह्यातील 103 दरडग्रस्त गावांना धोका असल्याने स्थानिक प्रशासनाला नागरिकांच्या स्थलांतरांचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच अतिवृष्टीच्या काळात नागरिकांना नदी, समुद्र आणि धरण परिसरात जाण्यास मनाई करण्यात आली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.