Pune : पुण्यात सलग दोन दिवसांपासून वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस

Heavy rains in Pune since yesterday, water logging in many areas.

एमपीसी न्यूज – जून महिन्याच्या पहिल्या दिवसापासून मान्सूनने चांगलीच हजेरी लावली आहे. पुण्यात सलग दोन दिवसांपासून पाऊस पडत आहे. या पावसामुळे कामावर जाणाऱ्या सर्वसामान्य कामगारांची मात्र मोठी गैरसोय झाली. रस्त्यांवर ठिकठिकाणी पाणी साचले असून वाहतूकीसाठी अडथळा निर्माण होतो आहे.

पुण्यात आज (बुधवारी) सकाळपासून पावसाने हजेरी लावली असून जोरदार वारा सुटला आहे.

पावसाची संततधार सुरू असल्यामुळे रस्तेही निसरडे झाले आहेत. त्यामुळे काही ठिकाणी दुचाकी घसरून नागरिकांना अपघाताला सामोरे जावे लागले.

कोंढवा, सिंहगड रोड, शिवाजीनगर, कोथरूड, कुमठेकर रस्ता, वारजे – माळवाडी, कर्वेनगर, शिवणे – उत्तमनगर, सातारा रोड,  हडपसर, बिबवेवाडी तसेच पिंपरी चिंचवड परिसरात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे.

पावसापासून बचावासाठी काही ठिकाणी नागरिकांनी रस्त्याच्या कडेला गर्दी करताना दिसून येत आहेत. मात्र, पाऊस काही थांबण्याचे नाव घेताना दिसत नाही. मॉन्सून आता केरळात दाखल झाला आहे.

मागील 3 दिवसांपासून पुण्यात आभाळ भरून येत आहे. मार्च, एप्रिल, मे महिन्यांत कमालीचा उकाडा जाणवत होता. पावसामुळे वातावरणात आता गारवा निर्माण झाला असून पुणेकर सुखावले आहेत.

मुंबई, अलिबाग किनारपट्टीवर ‘निसर्ग’ चक्रिवादळाच्या पाश्र्वभूमीवर हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. किनारपट्टीवर लोकांना खबरदारी म्हणून सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले आहे.

चक्रिवादळाचा वेग ताशी 110 किलोमीटर असल्यामुळे मुंबई सह जवळच्या परिसरात सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तसेच पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.