Talegaon : तळेगाव शहरात अवजड वाहनांना दिवसा प्रवेश बंद

Heavy vehicles barred from entering Talegaon city during the day.

एमपीसी न्यूज – वडगाव फाट्याकडून तळेगावकडे जाणा-या रत्यावर अवजड वाहनांना दिवसा प्रवेश बंदी करण्यात आली आहे. तळेगाव स्टेशन चौकातील अरुंद रस्ता आणि वर्दळीच्या ठिकाणामुळे हा निर्णय घेण्यात आला असल्याचे वाहतूक विभागाकडून सांगण्यात आले आहे.

चाकण एमआयडीसीकडून मुंबईकडे, मुंबईकडून चाकण एमआयडीसीकडे जाणारी वाहने तळेगाव शहरातून जातात. तसेच नाशिक आणि नगरकडून तळेगाव एमआयडीसीकडे येणारी वाहतूक देखील तळेगाव शहरातूनच जाते.

तळेगाव स्टेशन चौकात 20 फूट रुंदीचा रेल्वे पूल आहे. त्यामुळे पुलावरून एका वेळी दोन वाहने जाऊ शकतात. हा परिसर अत्यंत वर्दळीचा आहे. त्यामुळे या परिसरात वाहतूक कोंडी होत आहे.

दोन दिवसांपूर्वी दिवाळीची खरेदी करून घराकडे जात असलेल्या मायलेकीच्या दुचाकीला कंटेनरने धडक दिली. यामध्ये दुचाकीवरील आईचा मृत्यू झाला. तर मुलगी जखमी झाली. असे अपघात स्टेशन चौक परिसरात वारंवार घडत आहेत. यामुळे अवजड वाहतूकीला दिवसा बंदी घालण्यात आली आहे.

सकाळी सात ते रात्री सात वाजेपर्यंत कोणत्याही अवजड वाहनाला तळेगाव शहरातून जाण्यास बंदी घालण्यात आली आहे. दरम्यान इंदोरी जुना टोल नाक्याच्या मागील बाजूला असलेल्या गायरानात दिवसभर अवजड वाहने पार्क करता येतील, असे वाहतूक विभागाकडून सांगण्यात आले आहे.

सहा चाकी व त्यावरील अवजड वाहनांसाठी हा नियम करण्यात आला आहे. तात्पुरत्या स्वरुपात हा बदल करण्यात आला असून ज्या नागरिकांच्या या बदलाबाबत हरकती व सूचना असतील त्यांनी 24 नोव्हेंबर 2020 पर्यंत आपल्या हरकती आणि सूचना पोलीस उपायुक्त, वाहतूक शाखा, पिंपरी-चिंचवड यांच्या कार्यालयात जमा कराव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.