Pimpri: ‘होर्डिंग पडून मृत्यू झालेल्या कुटुंबियातील एकाला रेल्वेत नोकरी द्या, 25 लाखाची मदत करा’

शिवसेनेची मागणी

एमपीसी न्यूज – रेल्वे प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे होर्डिंगचा सांगडा अंगावर पडून मृत्यू झालेल्या चार जणांच्या कुटुंबियांतील एकाला भारतीय रेल्वे सेवेत तातडीने नोकरीत घ्यावे.  कुटुंबियांना 25 लाख रुपयांची मदत करावी, अशी मागणी शिवसेनेने रेल्वे प्रशासनाकडे केली आहे. तसेच पुणे, पिंपरी-चिंचवडसह लोणावळ्यापर्यंत असलेल्या सर्व होर्डिंगचे स्ट्रक्चरल ऑडीट करावे. रेल्वेच्या दोन्ही बाजूने सिमाभिंत बांधण्यात यावी, अशी मागणीही त्यांनी केली.

पुण्यातील जुना बाजार येथील रेल्वेच्या अधिका-यांच्या हलगर्जीपणामुळे होर्डिंगचा सांगडा अंगावर पडल्याने शुक्रवारी (दि.5)चार जणांचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. त्यामध्ये पिंपरी-चिंचवड शहरातील आकुर्डी येथील रहिवाशी असलेले जावेद खान यांचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. या कुटुंबियांना रेल्वे प्रशासनाने तोकडी मदत केली आहे. शिवसेना जिल्हाप्रमुख गजानन चिंचवडे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने विभागीय रेल्वे प्रबंधक मिलिंद देऊसकर यांची भेट घेतली. त्यावेळी मृत्युमुखी पडलेल्या कुटुंबियांना मदत करण्याची मागणी करण्यात आली. शहरप्रमुख योगेश बाबर, महिला संघटिका अॅड. उर्मिला काळभोर, पिंपरी विधानसभा प्रमुख प्रमोद कुटे, चिंचवड विधानसभा प्रमुख अनंत को-हाळे, सरिता साने, अनिता तुतारे, रेल्वे सल्लागार समिती सदस्य बशीर सुतार तसेच खान यांचे कुटुंब शिष्टमंडळात होते.

गजाजन चिंचवडे म्हणाले, ‘रेल्वे प्रशासनाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे चार जणांचा हकनाक बळी गेला आहे. मृत्यूमुखी पडलेल्या कुटुंबियांना रेल्वे प्रशासनाने केलेली आर्थिक मदत अतिशय तोकडी आहे. घरातील कर्ता पुरुष गमावल्याने त्यांचा संसार रस्त्यावर आला आहे. त्यांना उपजिवीकेचे दुसरे काहीच साधन नाही. मुलींची लग्ने व्हायची आहेत. मुलांचे शिक्षण चालू आहेत. त्यातच कर्त्या पुरुषाचे अपघाती मृत्यू झाल्याने कुटुंबाची आर्थिक घडी मोडली आहे. जगण्यासाठी काय करायचे हा त्यांच्यासमोर प्रश्न पडला आहे. कोणतीही चूक नसताना त्यांना संकटातून जावे लागत असून नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे या कुटुंबियांना भरीव मदत करण्यात यावी’.

मृत्यूमुखी पडलेल्या  कुटुंबातील एका व्यक्तीला रेल्वेच्या सेवेत सामविष्ट करुन घेण्यात यावे. 25 लाख रुपयांची आर्थिक मदत करावी. तसेच पुणे, पिंपरी-चिंचवड, लोणावळा पर्यंत असलेल्या होर्डिंगचे त्वरित स्ट्रक्चरल ऑडीट करण्यात यावे. अनधिकृत होर्डिंग काढावेत. सर्व होर्डिंगवर साईज, लांबी रुंदी, होर्डिंग मालकाचे नाव व मुदत नमूद करावी. रेल्वेच्या दोन्ही बाजूला संरक्षण भिंत बांधण्यात यावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

त्याचबरोबर रेल्वे विभागाने चिंचवड, नागसेननगर झोपडपट्टीच्या भागात रेल्वेच्या दोन्ही बाजूने सीमाभिंत बांधावी. चार दिवसांपूर्वी नागसेननगर येथे एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याची दुर्वेवी घटना घडली आहे. तसेच या ठिकाणी टवाळखोर जुगार, मटका, दारु पित बसलेले असतात. गुंडगिरी करतात. त्यामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण आहे. त्यासाठी रेल्वे प्रशासनाने त्वरित सिमाभिंत बांधावी. जेणेकरुन नागरिकांना त्रास कमी होईल, अशी मागणीही शिवसेनेने केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.