Pimpri News : रिक्षा चालक, फेरीवाले, बांधकाम मजूर आणि घरकाम करणाऱ्या महिलांना दिलेली मदत तुटपुंजी : बाबा कांबळे 

एमपीसी न्यूज – हातावर पोट असणार्‍या गोरगरीब कष्टकऱ्यांची दखल सरकारने घेतली ही बाब स्वागतार्ह आहे‌. पण, सरकारने दिलेली पंधराशे रुपये आर्थिक मदत अत्यंत तुटपुंजी आहे. कष्टकरी व हातावर पोट असणाऱ्या सर्व घटकांना किमान पाच हजार रुपये देणे आवश्यक आहे, अशी मागणी कष्टकरी कामगार पंचायत अध्यक्ष बाबा कांबळे यांनी केली आहे‌. 

याबाबत बाबा कांबळे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदन पाठवले आहे. रिक्षा चालक, फेरीवाले, बांधकाम मजूर , घरकाम करणाऱ्या महिलांसह असंघटित कामगार, कष्टकरी जनतेला सरकारने आर्थिक मदत करण्याचा निर्णय घेतला हि चांगली बाब आहे. परंतु आर्थिक मदत करताना सरकारने हात आखडता घेऊन, अत्यंत तुटपुंजी रक्कम जाहीर केली. आर्थिक मदतीची रक्कम पाच हजार रुपये असावी असे कांबळे यांनी या निवेदनात म्हटले आहे.

यापूर्वी देखील लॉकडाऊनच्या कालावधीत अनेकांचे रोजगार गेले. रिक्षाचालक, फेरीवाले, बांधकाम मजूर, घरकाम करणाऱ्या महिला, कागद, काच, पत्रा वेचक कष्टकरी महिलांसह काबाडकष्ट करणाऱ्या घटकांनी कर्ज काढून आपल्या कुटुंबाची उपजीविका भागवली. कर्जाचे हप्ते थकल्यामुळे अनेकांपुढे आर्थिक संकट उभे राहिले आहे. त्यामुळे कष्टकरी जनतेसाठी सरकारने आर्थिक पॅकेजची घोषणा करावी अशी मागणी बाबा कांबळे यांनी यापूर्वी केली होती.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.