Vadgaon Maval : संकटात असलेल्यांना मदत करा, पण प्रदर्शन नको : हभप गणेश महाराज वाघमारे

एमपीसी न्यूज  : एकमेकांना संकटकाळात एकमेकांची मदत करणं गरजेचं आहे. नुसता भावनिक, मानसिक आधार जरी मिळाला तरी अडचणीतला माणूस अर्ध्या अडचणीतून बाहेर येतो. त्याला ‘दर्शन’ म्हणतात. या दर्शनाचे प्रदर्शन करू नये, असे मत हभप गणेश महाराज वाघमारे यांनी व्यक्त केले.

मावळ विचार मंच आयोजित सरस्वती व्याख्यानमालेत ‘चित्त असू द्यावे समाधानी’ या विषयावर हभप गणेश वाघमारे महाराजांनी तिसरे पुष्प गुंफले व्याख्यानमालेचे यंदा 20 वे वर्ष आहे.

यावेळी पोटोबा देवस्थानचे मुख्य विश्वस्त सोपानराव म्हाळसकर, विश्वस्त सुभाष जाधव, अरूण चव्हाण, तुकाराम ढोरे, अ‍ॅड तुकाराम काटे, मावळ विचार मंचाचे संस्थापक अध्यक्ष भास्करराव म्हाळसकर, संस्थापक कार्याध्यक्ष डाॅ रवींद्र आचार्य, व्याख्यानमालेचे अध्यक्ष दीपक भालेराव, मा.सभापती गुलाबराव म्हाळसकर , मा.उपसरपंच सुधाकर ढोरे, ज्येष्ठ मार्गदर्शक अरविंद पिंगळे, नारायण ढोरे, पंढरीनाथ भिलारे, नंदकुमार दंडेल, यदुनाथ चोरघे, नाथामामा चव्हाण, अ‍ॅड आनंद गोपाळे, नगरसेवक अ‍ॅड विजयराव जाधव, अ‍ॅड अजित वहिले, कार्याध्यक्ष अश्विनीताई बवरे , कार्यक्रम प्रमुख संगीताताई ढोरे आदी उपस्थित होते.

संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, स्वामी विवेकानंद, छत्रपती शिवाजी महाराज, टिपू सुलतान, संत गोरोबा महाराज, सावरकर असे अनेकांचे दाखले देत वाघमारे महाराज व्याख्यानमालेत बोलताना म्हणाले, हयात असताना केलं जातं ते ‘दर्शन’ आणि गेल्यानंतर जे दाखवलं जातं ते ‘प्रदर्शन’ आहे. सध्या कोरोनाच्या काळात काहीजण मदतीचे प्रदर्शन करतात. ते चुकीचे आहे.

महाराज पुढे म्हणाले, ‘ठेविले अनंते तैसेची रहावे, चित्ती असू द्यावे समाधान’. प्रयत्न करून जर यश आले नाही, तर ठेविले अनंते तैसेची राहावे असे म्हणावे. पण प्रयत्न न करता जर ठेविले अनंते तैसेची राहावे, असे म्हणाल तर ते चुकीचे आहे.  महाराष्ट्रात जन्माला येणं हे सज्जनांचं भाग्य आहे. महाराष्ट्रात प्रत्येक जातीत संत आहे. संतांचे बोलणे, वागणे समाजहिताचे आहेत. संतांनी बघितलेली स्वप्ने देखील समाजाच्या हिताचीच आहेत. पण या संतांचे महत्व महाराष्ट्राला ते हयात असताना कळाले नाही. त्यांच्या नंतर त्यांचे महत्व जाणून घेत आहेत.

संतांनी महाराष्ट्राला लढायला शिकवले. संकटांना घाबरून जाऊ नका. जो टाक्याचे घाव सोसतो, त्यालाच देवत्व प्राप्त होतं. प्रत्येक दगडात देवत्व नाही, प्रत्येक फुल देवाच्या चरणी जात नाही. पण त्यात समाधानी असणं महत्वाचं आहे. दुसऱ्याची बरोबरी करू नये. त्यामुळे वाट्याला दुःखच येते. ईर्ष्या हे दुःखाचे दुसरे नाव आहे. खूप पैसा, श्रीमंत असणे म्हणजे समाधान नाही. आजकाल सर्वजण सुखी आहेत, पण समाधानी नाहीत. समाधान हे मानण्यात आहे. कितीही पुढे गेलात आणि तुम्हाला मागे वळून पाहता आले नाही तर व्यर्थ आहे. जीवनात सिंहावलोकन करणं गरजेचं आहे. हे समाधान वेळेतच शोधण महत्वाचं आहे. वेळ निघून गेल्यानंतर समाधान शोधता येत नाही. समाधान प्रयत्नातून मिळत नाही, तर अनुभवातून मिळतं. रडतो तो माणूस नाही, लढतो तो माणूस आहे. माणूस हा प्रयत्नशील आहे, असेही वाघमारे महाराज म्हणाले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पोटोबा देवस्थानचे सचिव अनंता कुडे यांनी केले. मानपत्र वाचन कल्पेश भोंडवे यांनी केले तर आभार रविंद्र म्हाळसकर यांनी मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.