Mulshi News : मुळशी तालुक्यातील पूरग्रस्त गावांना हिंजवडीतील सोसायट्यांचा मदतीचा हात

एमपीसी न्यूज – राज्यात पूरस्थिती हळूहळू ओसरत आहे. पूरग्रस्त भागात राज्यभरातून मदतीचा ओघ सुरू आहे. त्यातच मुळशी तालुक्यातील काही गावांना देखील पुराचा तडाखा बसला आहे. या पूरग्रस्तांना हिंजवडी परिसरातील काही सोसायटीमधील नागरिकांनी मदतीचा हात दिला आहे. नागरिकांनी जीवनावश्यक साहित्य एकत्र करून ते पूरग्रस्तांना वाटप केले.

पवन चोबे यांनी याबाबत माहिती दिली, मुळशी तालुक्यातील माळे गावात 22 जुलै रोजी ढगफुटी सदृश परिस्थिती निर्माण झाली. अवघ्या काही तासात शेकडो मिलिमीटर पावसाची नोंद झाली. यामुळे मोठ्या प्रमाणात आजूबाजूच्या पर्वतावरून पाणी पायथ्याला असलेल्या गावांमध्ये आले. गावांमध्ये पाण्याचा शिरकाव व्हायला रात्री दोन वाजता सुरुवात झाली आणि घरांमध्ये चार फुटापर्यंत पाणी भरले. पाण्याबरोबरच गाळ, पालापाचोला तसेच सापही घरात घुसले.

गावकऱ्यांना काही दिवसांसाठी गावातील प्राथमिक आरोग्य केंद्रात स्थलांतरित व्हावे लागले. माळे गावक-यांनी अशा प्रकारचा पाऊस गेल्या कित्येक पिढ्यांमध्ये अनुभवलेला नाही. जिल्हा परिषद अध्यक्ष आयुष प्रसाद यांनी या पार्श्वभूमीवर पूरग्रस्त भागातील नागरिकांना मदत करण्याचे आवाहन केले. यांच्या या आवाहनाला प्रतिसाद देत हिंजवडी भागातील अनेक रहिवासी सोसायटीचे सदस्य मदत कार्यात सहभागी झाले.

मेगापोलीस संग्रिया, ब्लू रिज युनिट ए बी सी, आणि एक्झर्बिया या रहिवासी संस्थांनी अन्नधान्य, पाणी, कपडे ब्लॅंकेट इत्यादी वस्तू रहिवाशांकडून रविवारी (दि. 25) एकत्रित केल्या. मुळशी तालुक्याचे ब्लॉक डेव्हलपमेंट ऑफिसर संदीप जठार यांनी जमा केलेल्या वस्तू वाटप करण्यासाठी व्यवस्था केली. त्यानंतर मंगळवारी (दि. 27) हिंजवडी भागातील काही रहिवाशांनी मुळशी तालुक्यातील पूरग्रस्त गावांना भेट देऊन मदत साहित्य वाटप केले.

मुळशी पंचायत समितीचे कृषी अधिकारी दत्तात्रय भालेराव, ग्रामसेवक, हिंजवडीचे साहिवासी पवन चोबे, अमित मुराकर मदत वाटपाच्या कार्यक्रमावेळी उपस्थित होते.  हिंजवडीतील HIRWA आणि HEART संस्थेचे रविंद्र सिन्हा व ज्ञानेन्द्र हुलसुरे यांनी सहभागी झालेल्या रहिवाशी सोसायटी सदस्यांचे आभार मानले.

-MPC-BOTTOM-BANNER-I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

.