Pune : हेमंत रासणे आणि धीरज घाटे यांच्या अनुभवाचा शहराच्या विकासासाठी लाभ होणार – मुरलीधर मोहोळ

एमपीसी न्यूज – भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या आदेशानुसार भाजपकडून पुणे महापालिकेच्या स्थायी समिती अध्यक्षपदासाठी हेमंत रासणे यांना उमेदवारी देण्यात आली. तर सभागृह नेतेपदासाठी धीरज घाटे यांची निवड करण्यात आली आहे. या दोघांच्या अनुभवाचा पुणे शहराच्या विकासासाठी लाभ होणार असल्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत सांगितले.

या दोघांना किती कालावधी असेल, असे विचारले असता, तो निर्णय पक्ष घेणार असल्याचे मोहोळ म्हणाले. उपमहापौर सरस्वती शेंडगे, स्थायी समितीचे अध्यक्ष सुनील कंबळे, सभागृह नेते श्रीनाथ भिमाले, सरचिटणीस गणेश बिडकर यावेळी उपस्थित होते.

सुनील कंबळे आणि सिद्धार्थ शिरोळे आमदार झाल्याने पक्षाने त्यांच्याकडील अतिरिक्त पदभार कमी करून राजीनामा देण्याचे आदेश दिले होते. श्रीनाथ भिमाले यांनाही आता पावणेतीन वर्षांचा कालावधी झाला. त्यामुळे त्यांनाही राजीनामा देण्यास सांगण्यात आले. त्यानुसार या तिघांनीही राजीनामे दिले. ‘पीएमपीएमएल’ संचालक पदावर लवकरच निवड करण्यात येणार आहे. घाटे यांनी पक्ष संघटना वाढविण्यासाठी सुमारे 25 वर्षे कार्य केले. भिमाले आणि कांबळे यांनीही चांगले काम केल्याचे मोहोळ म्हणाले.

दरम्यान, स्थायी समिती अध्यक्षपदाची लवकरच निवडणूक होणार आहे. या समितीत भाजपचे सर्वाधिक सदस्य असल्याने रासणे यांची निवड निश्चित मानली जात आहे. रासणे आणि घाटे यांची निवड जाहीर केल्यानंतर नगरसेवकांनी त्यांचे अभिनंदन केले. तर, समर्थकांनी पेढे वाटून, फटाके फोडून घोषणा देत आंनद साजरा केला. पक्षाने आपल्याला दिलेल्या संधीचे सोने करून पुणेकरांच्या समस्या मार्गी लावणार असल्याचे घाटे आणि रासणे यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
You might also like