MPC News Special : इथे आटला मायेचा पान्हा

अडीच वर्षात आढळली आठ अर्भके

एमपीसी न्यूज – कवी सुरेश भट यांच्या एका गीतात देवकीचा पान्हा मुलाच्या विरहात दुधाने जळाल्याचा उल्लेख आढळतो. पण अलीकडच्या काळात नाळ तुटताच पोटच्या (MPC News Special) गोळ्यांना रस्त्याच्या बाजूला, कचऱ्यात, मंदिरासमोर, बस स्थानकावर, झाडा झुडुपात फेकून देणाऱ्या महिलांचा मायेचा पान्हा पूर्णतः आटून गेला आहे. असे म्हणण्याचे कारण म्हणजे उद्योगनगरी, कामगारनगरी, अनेक गावांची संस्कृती एकत्र होऊन तयार झालेली पिंपरी-चिंचवड नगरी वेगळ्या अंगाने समोर येऊ लागली आहे. मागील अडीच वर्षांमध्ये शहरात आठ अर्भके सापडली आहेत.

Pune : इंडियन फ्लॅपशेल टर्टल आणि जळवांविषयी शोधनिबंध प्रसिद्ध

अल्पवयीन मुली, महिलांवर लैंगिक अत्याचार करून गर्भधारणा झाल्यानंतर बेकायदेशीर गर्भपात करण्याचे प्रमाण वाढत आहे. बहुतांश प्रकार कोवळ्या वयात झालेल्या अनैतिक संबंधातून होत आहेत. प्रेमाच्या नावाखाली अनैतिक संबंध ठेवायचे. पुढे त्यातून गर्भधारणा होते.

हा प्रकार घरच्यांना समजू नये म्हणून परस्पर गर्भपात करायचा. गर्भपात करता आला नाही तर बाळाला जन्म द्यायचा आणि अवघ्या एक दोन दिवसाच्या बाळाला उघड्यावर, आडबाजूला कुठेही सोडून त्याचा परित्याग करायचा. असेही प्रकार शहरात घडत आहेत. जगाच्या बागेत ही कोवळी फुले उमलण्याआधीच नष्ट होत आहेत. यानिमित्ताने स्वतःला सुसंस्कृत म्हणवून घेणा-या समाजाची ही काळी प्रतिमा समोर येत आहे. स्वतःच्या चुका लपवण्यासाठी नात्यांचा बळी दिला जात आहे.

पिंपरी-चिंचवड शहरात मागील अडीच वर्षात सात अर्भके, एक वर्षाचे एक बाळ आढळून आले आहे. सन 2021 मध्ये एप्रिल आणि ऑगस्ट महिन्यात दोन अर्भके सापडली. तर सन 2022 मध्ये ऑगस्ट, सप्टेंबर, नोव्हेंबर महिन्यात प्रत्येकी एक अर्भक मिळाले. दिघी येथे एक वर्षाची मुलगी साई मंदिरासमोर सोडून दिलेल्या अवस्थेत आढळली. पोलिसांनी तिला ताब्यात घेऊन तिच्यावर उपचार केले. तिची प्रकृती उत्तम असून एका बालगृहात तिचे संगोपन केले जात आहे. चालू वर्षातही दोन अर्भके आढळली आहेत.

फेब्रुवारी महिन्यात वाल्हेकरवाडी येथील एका ओढ्याच्या पाण्याच्या बाजूला एक दिवसाचे अर्भक आढळले. बाळाचा जन्म होताच त्याला सोडून देण्यात आले होते. तर मागील दोन दिवसांपूर्वी पिंपरी मधील एका हॉस्पिटलच्या कचरा कुंडीजवळ एक अर्भक मृतावस्थेत आढळून आले.

शाळेमध्ये असताना सोशल मीडियाच्या विकृत आकर्षणामुळे एकमेकांच्या सोबत यायचं. लहान वयात मोबाईल हातात येतो. ज्या वयात जे बघायला नको त्या गोष्टी बघायला मिळतात. त्यामुळे मने भरकटली जातात. शाळा-कॉलेजात, कामावर जाता-येता मुला-मुलींशी मैत्री करायची. काही दिवसानंतर या मैत्रीचं रूपांतर प्रेमात करायचं. प्रेमात पडल्यानंतर ‘साथ जियेंगे, साथ मरेंगे’ अशा प्रकारच्या आणाभाका घ्यायच्या.

स्वतःची स्वतःबद्दलची जबाबदारी, भविष्याचा विचार न करता प्रेमाच्या डोहात बुडून जायचं. याच प्रेमाच्या नावाखाली लहान वयात एकमेकांच्या शरीराची आकर्षणं होतात. त्यातून वयाच्या चौदाव्या, पंधराव्या वर्षातही गर्भधारणा होते. शाळेतच असे प्रकार घडतात असे नाही. या विकृतीची दुर्गंधी समाजात सर्वत्र पसरली आहे. प्रेमाला वयाची अट नाही. पण ते निभावण्यासाठी तेवढं शहाणपण नक्कीच गरजेचं आहे.

गर्भधारणा झाल्याचे लक्षात येताच प्रेमाच्या होडीत बसून शरीरसुखाच्या सागरात बुडणारे ताडकन एका क्षणात किना-यावर येतात. मग सगळ्या जबाबदाऱ्या, घरच्यांची मते यांचा विचार केला जातो. बहुतांश वेळेला हे प्रकरण घरी जाऊ नये म्हणून जीवाशी खेळून गर्भपात, गर्भस्त्राव केला जातो. मातृत्वाचा भार आपण पेलू शकत नसल्याचे जाणवताच कोवळे अर्भक रस्त्यावर, कचऱ्यात, नदी किनारी, बसस्टॉपवर असे कुठेही फेकून दिले जाते. आपल्या शरीराचा अंश आपण फेकून देत आहोत, याची पुसटशी कल्पना देखील या लोकांना येत नाही. अशा हैवानी मानसिकतेला मातृत्व तरी म्हणावे का, हा एक प्रश्न आहे.

प्रत्येक प्रेमी युगुल लग्न करण्याचा विचार करते. मात्र, गर्भधारणा झाल्यानंतर दोघांमध्ये भांडण सुरु होते. लग्न न करण्याचाही विचार अनेकदा होतो. काहीजण जाणीवपूर्वक प्रेमाचा आधार घेऊन शरीरसंबंध ठेवतात. त्यातून गर्भधारणा होते. त्यानंतर लग्नाचा तगादा लागताच जबाबदारी झटकली जाते. याचा घरच्यांना थांग लागताच ही प्रकरणे पोलीस ठाण्यात पोहोचतात. ज्यांच्या सोबत सात जन्माची स्वप्ने बघितली जातात. त्याला स्वतःहून तुरुंगाच्या रस्त्यावर लोटले जाते. यात चूक कोणाची हा प्रकरणपरत्वे तपासण्याचा विषय आहे. पण वस्तुस्थिती मात्र विचित्र वळणावर येऊन थांबते.

कायद्याची तरतूद
अर्भकाचा जन्म होण्यापूर्वी अथवा त्याचा जन्म झाल्यानंतर त्याचा मृत्यू होईल अशी कृती केल्यास. अर्भकाचा व 12 वर्षांपर्यंतच्या मुलाला त्याच्या पालकांनी उघड्यावर टाकून त्याचा परित्याग केल्यास कठोर शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे. भारतीय दंड संहिता कलम 312 ते 318 यातील कलमान्वये प्रकरणपरत्वे गुन्हे दाखल केले जातात. यामध्ये दोन वर्षांपासून आजन्म कारावास तसेच आर्थिक दंडाची शिक्षा आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.