Thergaon News: मुख्यमंत्री रोजगार निर्मिती उपक्रमाअंतर्गत बेरोजगारांना रोजगार संधी; 26 पर्यत करा अर्ज

एमपीसी न्यूज  –  पिंपरी – चिंचवड शहर युवासेना अधिकारी विश्वजीत श्रीरंग बारणे यांच्या पुढाकाराने मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमाअंतर्गत शासनाच्या विविध योजनांचा लाभ नागरिकांपर्यंत पोहचविला जाणार आहे. या उपक्रमाचा आज (सोमवारी) शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांच्या हस्ते थेरगाव येथे शुभारंभ झाला.

 

आजपासून 26 एप्रिलपर्यंत अर्ज वाटपाची प्रक्रिया केली जाणार आहे. माझा व्यवसाय, माझा हक्क या योजनेअंतर्गत छोट्या व्यावसायिकांना टेम्पो वाहन खरेदीचा लाभ घेता येईल. त्यासाठी 15 ते 35 टक्के शासनाची सबसिडी देण्यात येणार आहे.

थेरगाव येथे झालेल्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री रोजगार निर्मिती उपक्रमाचे (सीएमईजीपी) संचालक संतोष पवार, व्यवस्थापक विकास धारीवाल, शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख योगेश बाबर, माजी नगरसेविका सुलभा उबाळे, विमल जगताप, माजी नगरसेवक निलेश बारणे, युवा सेना अधिकारी विश्वजीत बारणे, शहरसंघटिका उर्मिला काळभोर, वैशाली मराठे, अनिता तुतारे, सरिता साने, आशा भालेकर, माजी नगरसेवक संपत पवार, उपजिल्हाप्रमुख बाळासाहेब वाल्हेकर, पिंपरी विधानसभा प्रमुख राजेश वाबळे, बशीर सुतार, सुनील हगवणे, संतोष सौंदणकर, रुपेश कदम, राजेश तरस, निलेश तरस, विजय साने, सोमनाथ गुजर, नवनाथ तरस, संतोष तरस, संतोष बारणे, भरत नायडू, रमेश जाधव, विलास जगदाळे, पुष्पलता तारु आदी उपस्थित होते.

 

खासदार बारणे म्हणाले, ”राज्य शासनाकडून विविध योजनांची अंमलबजावणी केली जाते. या योजना सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचत नाहीत. लाभापासून नागरिक वंचित राहतात. महाविकास आघाडीच्या माध्यमातून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या माध्यमातून उद्योगाला चालना मिळाली. या योजनांचा लाभ घेऊन सर्वसामान्य कुटुंबे आर्थिकदृष्ट्या सक्षम होतील. त्यासाठी या योजना तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी हा उपक्रम हाती घेतला आहे.

 

शिवसेना पदाधिका-यांनी सर्वसामान्यांपर्यंत या योजना पोहचाव्यात. बेरोजगार तरुणांनी या योजनांची माहिती करुन घ्यावी. 11 ते 26 एप्रिल दरम्यान थेरगाव येथील जनसंपर्क कार्यालयात योजनेचे अर्ज भरुन घेतले जातील. योजना समजावून सांगितली जाईल. या योजनेतून शहरातील जास्तीत-जास्त बेरोजगार तरुणांनी लाभ घ्यावा, असे आवाहन बारणे यांनी केले.

 

या योजनेचा सर्वाधिक लाभ महिलांना मिळावा.  या योजना तळागाळापर्यंत पोहोचविण्यासाठी कार्यकर्त्यांनी प्रयत्न करावेत, असे आवाहन सुलभा उबाळे यांनी केले. योजनेचा नागरिकांना कशाप्रकारे लाभ मिळेल, नागरिकांनी लाभासाठी कोणती कागदपत्रे द्यावीत याबाबतची माहिती योगेश बाबर, राजेश वाबळे यांनी विचारली.सीएमईजीपीचे संचालक संतोष पवार यांनी योजनेची सविस्तर माहिती दिली.

राज्य शासनाच्या माझा व्यवसाय ,माझा हक्क या योजनेअंतर्गत छोट्या व्यावसायिकांना टेम्पो वाहन खरेदीचा लाभ घेता येईल. त्यासाठी 15 ते 35 टक्के शासनाची सबसिडी देण्यात येणार आहे.  फास्ट फूड व्यवसाय, आईस्क्रिम, फळ व भाजी विक्री, इडली, डोसा विक्री, मालवाहतूकीचा व्यवसाय करता येईल.

 

टुरिस्ट गाडी कंपनीकडे भाडेतत्वार लावण्यासाठी मार्गदर्शन केले जाईल. अण्णासाहेब पाटील मागास विकास महामंडळ, राज्य व आते मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ आणि वसंतराव नाईक विमुक्त व भटक्या जाती जमाती  आर्थिक विकास महामंडळ या योजनामधील  लाभ नागरिकांना दिला जाणार आहे. टेम्पो खरेदी,  इतर पुरक व्यावसायाला प्राधान्य दिले जाणार असल्याचे युवा सेना अधिकारी विश्वजीत बारणे यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.