Hidden talent of Sushant: मला तर तो भौतिकशास्त्राचा विद्यार्थीच वाटला…

Hidden talent of Sushant: I thought he was a physics student 'आमच्या दोघांच्याही फ्लाईटला वेळ होता. आम्हाला टाइमपासच करायचा होता. मी एक बीअरचा मग घेऊन बसले होते. तेव्हा सुशांतने मला अत्यंत नम्रपणे मी येथे बसू शकतो का असे विचारले. नंतर आमच्या गप्पा सुरु झाल्या.

एमपीसी न्यूज- गेल्या रविवारी सुशांतसिंह राजपूतने गळफास लावून आत्महत्या केली. त्यावर खूप चर्चा झाली. त्याला एवढ्या टोकाचे पाऊल का उचलावेसे वाटले, कोणाशी मनमोकळेपणाने बोलता आले नाही का, खरं काय घडलं असेल, नक्की त्यावेळी त्याच्या मनात काय विचार सुरु असतील यावर खूप उहापोह केला गेला.

पण हळूहळू सुशांतचे वेगळे पैलू जगासमोर येऊ लागले आहेत. इंजिनिअरिंग सोडून चित्रपटसृष्टीकडे वळलेला सुशांत खूप हुषार होता हे आता उघड सत्य आहे. त्याला अनेक आवडी होत्या.

त्याला खगोलशास्त्रात रुची होती. त्याने चंद्रावर प्लॉटदेखील घेतला होता अशा एक एक गोष्टी आता उघड होऊ लागल्या आहेत. त्याला वाचनाची प्रचंड आवड होती. त्याच्याकडे विविध विषयांवरील पुस्तकांचा मोठा संग्रह होता.

अशातच सुशांतचा आणखी एक वेगळा पैलू एका पोस्टद्वारे उघड करण्यात आला आहे. नम्रता दत्ता नावाच्या एका पीएचडी स्कॉलरने ट्विटरवर आपला अनोखा अनुभव शेअर केला आहे.

ही पॅरिस एअरपोर्टवरील गोष्ट आहे. दोन वर्षांपूर्वी नम्रता आणि सुशांतची अचानकपणे पॅरिस एअरपोर्टवर भेट झाली. तेव्हा त्यांनी दोघांनी तेथे डीएनए आणि एक्स रे क्रिस्टलोग्राफी मेथडवर चर्चा केली.

‘आमच्या दोघांच्याही फ्लाईटला वेळ होता. आम्हाला टाइमपासच करायचा होता. मी एक बीअरचा मग घेऊन बसले होते. तेव्हा सुशांतने मला अत्यंत नम्रपणे मी येथे बसू शकतो का असे विचारले. नंतर आमच्या गप्पा सुरु झाल्या.

तो अभिनेता आहे हे मला माहीतच नव्हते. मला तो फ्रान्समध्ये शिकणारा भौतिकशास्त्राचा विद्यार्थीच वाटला. तो ज्या पद्धतीने फिजिक्समधील शोधांबदद्ल बोलत होता ते भारावून टाकणारे होते.

नंतर त्याने मला सांगितले की तो अभिनेता आहे. मी तर त्याला चक्क का म्हणूनच विचारले’, असे नम्रताने तिच्या पोस्टमध्ये लिहिले आहे.

‘त्याने मला माझ्या थिसीसबद्दल विचारले आणि मी थिसीसच्या मेथडॉलॉजीबद्दल जे सांगत होते तो त्यात रस घेऊन ऐकत होता. मला प्रश्न विचारत होता. या सगळ्यामध्ये आमचे पाच तास कसे गेले ते आम्हाला दोघांनाही कळलेच नाही.

त्याने मला क्वांटम फिजिक्सबद्दल जे काही सांगितले त्यावरुन मला त्याच्या या विषयातील अभ्यासाची जाणीव झाली. मी एका जिनिअसशी बोलत आहे याचा मला अंदाज आला होता’.

नम्रताने सुशांतला विचारले की, ‘अशी कोणती गोष्ट आहे जी बदलणे तुला आवडेल’? तेव्हा सुशांतने सांगितले की ‘मला फिजिक्सचा अभ्यास करणे मनापासून आवडेल. असा अभ्यास करण्यासाठी एखादी स्कॉलरशिप मिळेल का’? असेदेखील त्याने विचारले, असे नम्रताने पुढे म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.