Pimpri News : महापालिका आयुक्तांकडून  ‘लपवाछपवी’, पारदर्शक कारभाराचे वावडे!

0

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेचे नवनियुक्त आयुक्त राजेश पाटील यांनी सुरवातीपासूनच ‘अ’पारदर्शक, लपवाछपवीचा कारभार सुरु केला आहे. सहाय्यक आयुक्तांच्या कामकाजाचे फेरवाटप करुन सात दिवस उलटे तरी त्याबाबतचे आदेश महापालिकेच्या संकेतस्थळावर टाकले नाहीत. त्यामुळे महापालिका आयुक्तांना पारदर्शक कारभाराचे वावडे आहे का, असा सवाल उपस्थित केला जात आहे. तसेच आयुक्तांनी अवघ्या सहा दिवसात स्व:ताचाच निर्णय फिरविला असून अतिरिक्त आयुक्तांकडील नगररचना विभाग काढून घेतला आहे.

आयुक्त राजेश पाटील यांनी सहाय्यक आयुक्तांच्या कामकाजाचे 18 फेब्रुवारीला फेरवाटप केले. त्यामध्ये राजेश आगळे यांच्याकडील झोनिपू विभाग काढला असून त्यांच्याकडे ‘इ’ क्षेत्रीय कार्यालय, प्रशासन विभागाकडील सहाय्यक आयुक्तपदाचे कामकाज दिले आहे. अण्णा बोदडे यांच्याकडे झोनिपू, नागरवस्ती विभागकडील दिव्यांग कक्षाची जबाबदरी सोपविली आहे. त्यांच्याकडील ‘क’ क्षेत्रीय कार्यालयाची जबाबदारी प्रशासन अधिकारी अवधूत तावडे यांच्याकडे सोपविण्यात आली आहे.

तर, ‘क’ क्षेत्रीय कार्यालयाचे प्रभारी प्रशासन अधिकारी नाना मोरे यांच्याकडे ‘इ’ क्षेत्रीय कार्यालयातील प्रशासन अधिकारीपदाची जबाबदारी दिली आहे. त्यानुसार अधिकारी नवीन ठिकाणी रुजूही झाले आहेत. मात्र, हे बदल करुन आज सात दिवस उलटले. तरी, देखील याची माहिती महापालिकेच्या संकेतस्थळावर टाकली नाही. त्यामुळे पदाधिकारी, नगरसेवकांना कोणत्या अधिका-याकडे कोणता विभाग आहे, हे लक्षात येत नाही. यापूर्वीचे आयुक्त अधिका-यांच्या बदल्याचे आदेश तत्काळ  महापालिका संकेतस्थळावर टाकण्याच्या सूचना करत होते. पण, आयुक्त पाटील यांच्या प्रशासनाने लपवाछपवी सुरु केल्याने संशय बळावत असल्याचा आरोप नगरसेवक करत आहेत.

अवघ्या सहा दिवसात बदलला निर्णय!  

_MPC_DIR_MPU_II

आयुक्त राजेश पाटील यांनी 18 फेब्रुवारी रोजी अतिरिक्त आयुक्तांच्या कामकाजाचे फेरवाटप केले. तसेच स्व:ताकडेही काही विभाग ठेवले होते.  अतिरिक्त आयुक्त (एक) विकास ढाकणे यांच्याकडे नगररचना विभागाचे कामकाज सोपविले होते. त्यामध्ये आयुक्तांनी अवघ्या सहा दिवसात बदल केला आहे. नगररचना विभागाची जबाबदारी ढाकणे यांच्याकडून काढून घेतली आहे. नगररचना विभागाचे संपूर्ण नियंत्रण आयुक्तांनी स्व:ताकडे घेतले आहे. आयुक्तांना अवघ्या सहा दिवसात स्व:ताचाच निर्णय बदलावा लागल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

दरम्यान, ओरिसा राज्यातून आयुक्त राजेश पाटील पिंपरी-चिंचवड महापालिकेत राज्य नियुक्तीने आले आहेत. ओरिसा सारख्या छोट्या राज्यातील जिल्ह्याचा जिल्हाधिकारी म्हणून त्यांनी काम केले आहे. त्यामुळे त्यांना महापालिकेचे कामकाज झेपेल की नाही अशी शंका नगरसेवकांकडून खासगीत उपस्थित केली जात आहे.

दरम्यान याबाबत प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी आयुक्त राजेश पाटील यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही. त्यांच्या संपर्क झाल्यानंतर त्यांची बाजू ‘अपडेट’ केली जाईल.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.