Sangvi : महिलांनी बनवलेले पापड, लोणचे, मसाले व वस्तूंना पवनाथडीमध्ये जास्त मागणी

एमपीसी न्यूज – सांगवी येथील पी.डब्ल्यू.डी मैदानावर पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने आयोजित पवनाथडी जत्रेला पहिल्या दिवसापासूनच नागरिकांचा प्रतिसाद मिळत आहे. खासकरुन महिलांनी बनवलेल्या लोणची, पापड, मसाले यांना जास्त मागणी आहे.

पवनाथडी जत्रेस आमदार लक्ष्मण जगताप, महापौर उषा उर्फ माई ढोरे, महिला व बालकल्याण समिती सभापती निर्मला कुटे, नगरसदस्या शारदा सोनवणे, आरती चोंधे, सीमा चौगुले, माधवी राजापुरे नगरसदस्य हर्षल ढोरे,सागर आंगोळकर, संतोष कांबळे, माजी नगरसदस्य भाई सोनवणे, ‘ह’ प्रभाग अध्यक्ष अंबरनाथ कांबळे, सहाय्यकआयुक्त तथा नगरसचिव उल्हास जगताप, जनसंपर्क विभागाचे रमेश भोसले आदी मान्यवरांनी भेट दिली.

जत्रेत प्रवेश केल्यानंतर डाव्या बाजूला ‘मामाचे गाव’ साकारण्यात आले आहे. तरुण, महिला यांच्यासाठी खास सेल्फी पॉइंट येथे करण्यात आले आहे. तसेच या ठिकाणी टेलिस्कोपमधून चंद्र पाहण्याची सोयही करण्यात आली आहे.

यंदाच्या पवनाथडीमध्ये खाद्यपदार्थांबरोबरच खास शिवलेले खणाचे ड्रेस, वुडन आर्टच्या आकर्षक वस्तू , मातीच्या वस्तू, डाएट फराळाचे पदार्थ, लाकडी खेळणी तसेच खास गावाकडची चव असलेले पापड, लोणची, मसाले यांचीही रेलचेल आहे. शहरात न मिळणा-या अशा गव्हाच्या कुरडया, हाताने बनवलेल्या गव्हाच्या शेवया यांना महिला पसंती देत आहेत.

पवनाथडीच्या तिस-या दिवशी दिग्दर्शक संतोष पवार यांचे ‘यदा कदाचित’ हे विनोदी नाटक सादर झाले या कार्यक्रमाचे सूत्र संचालन शुभांगी शिंदे व किशोर केदारी यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.