Hinjawadi : वाचक लिहितात; आयटी पार्कमुळे हिंजवडीचा रुबाब वाढतोय

एमपीसी न्यूज – पुण्यापासून 35 किलोमीटर अंतरावर असलेल्या हिंजवडी गावाचा चेहरा मोहरा दिवसेंदिवस बदलत आहे. गावातील ग्रामीण जीवनशैली बदलली असून शहरी जीवनशैली आणि धकाधकीच्या जीवनाकडे वाटचाल सुरु आहे. या हिंजवडी बद्दल एमपीसी न्यूजचे वाचक मंदार दौलत भोईर यांनी काही निरीक्षणे टिपली आहेत.

हिंजवडी गाव पूर्वी अर्धसंपन्न गाव म्हणून ओळखलं जायचं. गावातील बहुतांश अर्थकारण शेतीवर आधारित असायचं. काही गावकरी रोजगारासाठी पुण्याकडे धाव घ्यायचे. नकाशावर हिंजवडी हे गाव शोधून शोधून पाहावे लागत होते. काही दिवसांनी शासनाचे लक्ष या गावाकडे गेले आणि विकासाच्या संधी गावात चालून आल्या. वेगवेगळ्या कंपन्या, आयटी पार्क इथे तयार झाले. यामध्ये काम करणा-या लोकांना राहण्यासाठी मोठमोठ्या वसाहती आणि टोलेजंग इमारती सुद्धा उभ्या राहिल्या. यामुळे हिंजवडी गावाचा रुबाब दिवसेंदिवस वाढतच गेला.

गावात आज प्राथमिक शाळेपासून ते मोठमोठ्या महाविद्यालय, दवाखाने, टपाल कार्यालय, पोलीस ठाणे या सगळ्या सुविधा उपलब्ध आहेत. गावात आलेल्या विकासाच्या संधीमुळे गावाची लोकसंख्या आणि तिथे तात्पुरत्या राहणा-या लोकांची संख्या लाखांच्या घरात गेली. हिंजवडी गावाची लोकसंख्या ठरावीक असताना गावकऱ्यांनी विचार देखील केला नसेल कि आपलं हे गाव हजारो-लाखो नोकरदारांचे पोट भरण्यासाठी उपयोगी ठरेल. गावाची आयटी पार्कसाठी निवड झाली आणि पिंपरी चिंचवड उद्योगनगरी पासून काही अंतरावर असलेले हे गाव भारताच्या नकाशावर ठळक दिसू लागले.

गावक-यांनी आपल्या जमिनी विविधरंगी देशी विदेशी कंपन्या स्थापन करण्यासाठी उपलब्ध करून दिल्या. हिंजवडीत पोट भरण्यासाठी येणा-या सर्वांच्या सेवेसाठी हिंजवडीकर सरसावले. टोलेजंग इमारतींसह, मोठे शॉपिंग मॉल उभे राहिले. मध्यंतरी हिंजवडी गावाचे नाव बाहेरून आलेल्या नागरिकांनी ‘हिंजेवाडी’ असे करण्याचा प्रयत्न केला. पण मूळ नावापुढे तो प्रयत्न म्हणजे फुका बार ठरला. गावाचा चेहरा पूर्णपणे बदलून गेला असून हे गाव आता फेज एक, दोन, तीन मधून शहरीकरणाकडे वाटचाल करताना दिसतंय.

कसारसाई धरणाकडून या गावाकडे बघताना ग्रामीण भागात शहरीकरणाने केलेला शिरकाव अगदी सहजतेने पाहायला मिळतो. हे दृश्य पाहताना मनाला आनंद वाटतो. गर्दीत हरवलेले हिंजवडी अशी ओळख हल्ली काही नेटक-यांकडून मिळत आहे. पण त्यावर प्रशासन तोडगा काढत आहे. ठिकठिकाणी वाहतुकीच्या सुविधा उपलब्ध केल्या जात आहेत. पण हिंजवडीने आपले गावपण त्यातही जपून ठेवले आहे. ग्रामदैवत म्हातोबा महाराज जत्रा दरवर्षी चैत्र पौर्णिमेला भरते. या दिवशी अनेक ग्रामीण सोपस्कार केले जातात. अनेक पारंपारिक सण, उत्सव आजही इथे साजरे केले जातात. संस्कृतीच्या उंबरठ्यावरून आधुनिकतेकडे पाहणा-या हिंजवडी गावाला जगाच्या नकाशावर आणण्यासाठी सर्वच क्षेत्रातून तुझं-माझं न करता आपलं म्हणून प्रयत्न होत आहेत, ही बाब महत्वाची.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.