क्राईम आणि रोमांसचा अद्भभूत मिलाप ‘एंड काऊंटर’

(दीनानाथ घारपुरे)

एमपीसी न्यूज- अंडरवर्ल्ड, गँगवॉर, एन्काउंटर यांचे अनेक वास्तविक जीवनातील किस्से आपण पाहिलेत आणि ऐकलेत. त्यावर आधारित अनेक सिनेमेही प्रदर्शित झाले आहेत. अशाच क्राईम पार्श्वभूमीवर आधारित ए.जे. इंटरटेनमेंट निर्मिती संस्थेअंतर्गत जतिन उपाध्याय निर्मित, अलोक श्रीवास्तव लिखित, दिग्दर्शित ‘एंड-काऊंटर’ या हिंदी चित्रपटाचा ट्रेलर आणि संगीत प्रकाशन सोहळा नुकताच अभिनेते अनिल धवन यांच्या हस्ते मुंबईत पार पडला. यावेळी सिनेमातील कलाकार प्रशांत नारायणन, मृण्मयी कोलवालकर, अनुपम श्याम, अभिमन्यू सिंग, एहसान कुरेशी उपस्थित होते. या चित्रपटाला संगीत लाभलंय संगीत दिग्दर्शक राहुल जैन यांचे.

चित्रपटाच्या नावावरून कदाचित तुम्ही अंदाज बांधू शकाल की हा सिनेमा गुन्हेगारी विश्वावर आधारित आहे. सिनेमाबद्दल दिग्दर्शक अलोक श्रीवास्तव सांगतात की, हा सिनेमा फक्त गुन्हेगारी विश्वावर आधारित नसून त्यात कॉमेडी, अॅक्शन, फ्रेंडशिप, प्रेम यांचा देखील समावेश आहे. सिनेमाची गोष्ट घडते ते लोकेशन महाराष्ट्रातीलच असून आजवर मराठी आणि हिंदी सिनेमात बघितले नसतील असेच आहेत. हा चित्रपट कोणत्याही ठराविक वयोगटासाठी नसून सर्व वयातील लोक याचा आस्वाद घेऊ शकतात. 21 व्या शतकात अंडरवर्ल्ड, गँगवॉर, बिल्डर्स आणि पोलीस ह्यांच न माहित असलेलं रूप आपल्याला पाहायला मिळेल.

सिनेमात काम करणं हे आजच्या तरुण वर्गाचं मोठं आकर्षण आणि बॉलीवुडमध्ये म्हणजेच हिंदी सिनेमात काम करणे हे तरुण वर्गासोबत तमाम भाषेतल्या कलाकारांचे स्वप्न असते. हेच स्वप्न सत्यात अवतरलंय मराठमोळी अभिनेत्री मृण्मयी कोलवालकर हिच्या बाबतीत. या सिनेमातून ती हिंदी सिनेमात पदार्पण करत आहे.

सिनेमात नायकाची भूमिका बॉलीवूड आणि दाक्षिणात्य सिनेमातील आघाडीचा आणि गुणी अभिनेता प्रशांत नारायणन करतो आहे. प्रशांत यात एका पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत आहे. या भूमिकेसाठी प्रशांतने अनेक दिवस यासाठी मेहनत घेतली आहे. येत्या 8  फेब्रुवारीला हा सिनेमा संपूर्ण भारतात प्रदर्शित झाला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.