Pimpri : सीएएच्या समर्थनार्थ हिंदू बांधवांचा पिंपरीत मोर्चा

एमपीसी न्यूज – नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाच्या समर्थनात पिंपरी-चिंचवड शहरातील हिंदू बांधवांच्या वतीने पिंपरीत रविवारी (दि. २२) काढण्यात आला. वंदे मातरम, भारत माता की जयच्या घोषणा देत विधेयकाचे स्वागत करण्यात आले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यानंतर संविधान वाचन करण्यात आले. यावेळी खासदार अमर साबळे, आमदार महेश लांडगे, आमदार लक्ष्मण जगताप, सभागृह नेता एकनाथ पवार, महापौर माई ढोरे, स्थायी समिती सभापती विलास माडीगिरी, नगरसेवक तसेच विविध संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. सुमारे दोन हजार नागरिकांनी यामध्ये सहभाग घेतला.

‘वी लव्ह नरेंद्र मोदी, वी लव्ह अमित शहा’, ‘भारत माता की जय’, ‘वी सपोर्ट सीएए’, वंदे मातरम’, ‘वंदे मातरम का नारा है, निर्वासित हिंदू, बौद्ध, शीख, जैन, पारसी, ख्रिश्चन हमारा है’ अशा घोषणा देऊन सीएए कायद्याचे समर्थन करण्यात आले. तिरंगा, भगवा झेंडा हाती घेऊन कार्यकर्त्यांनी समर्थनार्थ घोषणा दिल्या.

राज्यसभेचे खासदार अमर साबळे म्हणाले, भारतीय जनता पार्टी आणि मोदींचं हिंदुत्व केवळ एखाद्या धर्मपूरतं मर्यादित नाही. तर ते देशातील प्रत्येक धर्मासाठी समान आहे. पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि बांगलादेश या तीन देशात ज्या हिंदू अल्पसंख्यांक समाजाचे धार्मिक हाल होत आहेत, केवळ त्यांना या कायद्यान्वये भारतीय नागरिकत्व मिळणार आहे. यामुळे कोणत्याही अन्य समुदायांच्या तसेच नागरिकांच्या स्वातंत्र्याला धोका होणार नाही. अल्पसंख्याकांना सन्मानाने जगता यावे यासाठी हा कायदा केला आहे.”

नागरिकत्व दुरुस्ती कायद्याला राजकीय द्वेषातून विरोध केला जात आहे. हा कायदा देशहिताच्या दृष्टीनेच घेण्यात आला आहे. आपल्या देशातील मुस्लिम बांधवाना या कायद्यापासून कोणताही धोका नाही, मात्र त्यांना भडकविण्याचे काम इतर पक्षांच्या माध्यमातून सुरू आहे. ज्यावेळी स्वातंत्र्य मिळाले, त्यावेळी धार्मिक मुद्यावर दोन देशांची निर्मिती झाली. त्यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी धर्माप्रमाणे हिंदूंना हिंदूस्थानात व मुस्लिम बांधवानी पाकिस्तान राष्ट्रात जाणे योग्य आहे, असे सांगितले होते. त्यावेळी त्यांचे ऐकले असते तर आज विरोधी मोर्चे काढण्याची वेळ आली नसती. देशामध्ये घात-पात करण्याच्या उद्देशांने येणाऱ्यांना या कायद्यामुळे आळा बसेल. देशामध्ये शांतात नांदवायची असेल तर या कायद्याच्या समर्थनार्थ उभे राहिले पाहिजे, असेही खासदार साबळे म्हणाले.

आमदार महेश लांडगे म्हणाले, “या कायद्याविरोधात विद्यार्थ्यांना पुढे केले जात आहे. त्यांना भडकविण्याचा प्रयत्न केला जात आहे. या कायद्याला विरोध नाही तर त्याचे समर्थन करणे आवश्‍यक आहे.”

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
You might also like