BNR-HDR-TOP-Mobile

Pimpri : हिंदु जनजागृती समितीची ‘आदर्श गणेशोत्सव मोहीम’

मोहिमेत सहभागी होण्याचे सर्व गणेशभक्तांना आवाहन

एमपीसी न्यूज – लोकमान्य टिळकांनी ज्या हेतूने हा उत्सव सुरु केला, तो मूळ हेतू आज मागे पडला असल्याचे दिसत आहे. उत्सवाचा मूळ उद्देश पुनरुज्जीवित करण्यासाठी समितीने ही मोहीम हाती घेतली आहे. समितीच्या वतीने ‘गणेशभक्तांनी धर्मशास्त्रात सांगितल्यानुसार शाडूच्या मातीची आणि नैसर्गिक रंगाने रंगवलेली गणेशमूर्ती आणावी, तसेच शास्त्रानुसार गणेशमूर्तीचे विसर्जन वाहत्या पाण्यातच करावे’ असे आवाहन केले जात आहे. गणेशमूर्ती विक्रेता यांचेही संपर्क करून त्यांना शाडूच्या मातीची मूर्ती विक्री करण्याविषयी आवाहन करण्यात आले आहे. सार्वजनिक गणेश मंडळांच्या भेटी घेऊन त्यांनाही आदर्श गणेशोत्सव कसा साजरा करावा याविषयी प्रबोधन केले जात आहे.

महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हटल्या जाणार्‍या पुणे, पिंपरी, चिंचवड शहरात गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. हा उत्सव शास्त्रानुसार साजरा केला जावा, यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘आदर्श गणेशोत्सव मोहीम’ राबवण्यात येते. ही मोहीम मागील 15 वर्षांपासून राबविण्यात येत आहे. कागदी लगद्यापासून बनवलेल्या मूर्तीने मोठ्या प्रमाणात प्रदूषण होते हे समितीने सप्रमाण सिद्ध केले आहे. यामुळे शासनाने कागदी लगद्याचा मूर्तीसाठी वापर करणे थांबवावे, असा निर्णय दिला आहे. अमोनियम बायकार्बोनेट या रसायनाच्या माध्यमातूनही होणारे जलप्रदूषण लक्षात घेऊन शाडू मातीच्या मूर्तीचाच वापर आणि प्रोत्साहन देण्यासंदर्भात समितीने लोकप्रतिनिधी, प्रशासन, मूर्तिकार, गणेश मंडळे यांना निवेदने दिली आहेत.

समितीने काही ठिकाणी गणेशोत्सव समन्वयक शिबिरांचेही आयोजन केले. या शिबिरांच्या माध्यमातून गणेश मंडळांनी ‘सार्वजनिकरित्या होणारा हा उत्सव आम्ही शास्त्रीय पद्धतीनुसार साजरा करू’ असा निर्धार केला. या मोहिमेचे सर्वच गणेशभक्तांकडून कौतुक होत आहे. सर्वत्रच्या गणेशभक्तांनी या आदर्श गणेशोत्सव मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन हिंदु जनजागृती समितीने केले आहे.

HB_POST_END_FTR-A2

Advertisement

Advertisement

You might also like