Pimpri: केंद्र सरकारची ‘एचए’ला 164 कोटीची मदत, कामगारांचे थकित वेतन, स्वेच्छा निवृत्तीचे लाभ अदा

मजदूर संघाने मानले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार

एमपीसी न्यूज – मागील काही वर्षांपासून आर्थिक संकटात असलेल्या हिंदुस्थान अ‍ॅन्टिबायोटिक्स कंपनीला (‘एचए’) केंद्र सरकारने कोरोनाच्या संकटात दिलासा दिला आहे. 163 कोटी 85 लाख रुपयांची मदत कंपनीला केली आहे. या रकमेतून 501 कामगारांचे फेब्रुवारी 2020 पर्यंतचे 29 महिन्यांचे थकीत वेतन आणि 116 कामगारांना मार्च 2020 अखेरचे स्वेच्छानिवृत्तीचे लाभ देण्यात आली आहे. ‘एचए’ मजदूर संघाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठवून त्यांचे आभार मानले आहेत.

पेनिसिलीनचे उत्पादन करणारी केंद्र सरकारची एचए कंपनी पिंपरीत आहे. मागील काही वर्षांपासून ही कंपनी मोठ्या आर्थिक तोट्यात आहे. कामगारांचा पगार देखील होत नव्हता. त्यामुळे कामगारांवर उपासमारीची वेळ आली होती. सध्या जगावर कोरोनाचे संकट आहे. या बिकट काळात कामगारांची अधिकच अडचण झाली होती. त्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने जुलै 2019 मध्ये मंजूर झालेल्या 280 कोटी 15 लाख मदत निधीतील उर्वरित 163 कोटी 85 लाखांचा टप्पा कंपनीला दिला आहे.

या रकमेतून एच.कंपनीतील 501 कामगारांचे फेब्रुवारी 2020 पर्यंतचे 29 महिन्यांचे थकीत वेतन आणि 116 कामगारांना मार्च 2020 अखेरचे स्वेच्छानिवृत्तीचे लाभ देण्यात आले आहेत. संकटात मदत मिळाल्याने कामगारांना मोठा दिलासा मिळाला आहे.

मजदूर संघाकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार!

कोरोना विषाणूचे महाभयंकर संकट दूर करण्यासाठी संपूर्ण देश लढत आहे. या बिकट काळामध्ये कामगारांची आर्थिक समस्या दूर करण्यासाठी मदत केल्यानिमित्त हिंदुस्थान अँटिबायोटिक्स (एचए) मजदूर संघाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठवून आभार मानले आहे. तसेच अर्थमंत्री निर्मला सितारामण, रसायन मंत्री सदानंद गौंडा, राज्यमंत्री मनसुख मांडविया, एचएचे अध्यक्ष खासदार मनोज कोटक, भारतीय मजदूर संघाचे प्रदेशाध्यक्ष अण्णा धुमाळ, आमदार महेश लांडगे, सामाजिक कार्यकर्ते मदन दिवाण यांचे निधी मिळण्यासाठी सहकार्य लाभल्याने त्यांचेही आभार मानले आहेत. संघाचे उपाध्यक्ष विजय पाटील, सचिव संजय भोसले, सहसचिव आबू भारणे, प्रवीण मोरे, खजिनदार राजेंद्र जाधव यांनी सर्वांचे आभार मानले आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.