Hinjawadi : ‘आम्ही गाववाले आहोत, आधी आमच्या वाहनात पेट्रोल भर’ म्हणत टोळक्याचा पेट्रोल पंपावर राडा; सहाजणांवर गुन्हा

एमपीसी न्यूज – ‘आम्ही गाववाले आहोत, आधी आमच्या वाहनात पेट्रोल भर’ म्हणत वाहनामध्ये अगोदर पेट्रोल का भरले नाही, म्हणून सहा जणांनी तलवार घेऊन धमकावत पेट्रोल पंपावर गोंधळ घातला. ही घटना बावधन येथे मंगळवारी (दि. 29) रात्री आठच्या सुमारास घडली.

सुनील वामनराव शिंदे (वय 58, रा. राजस बंगला, वीरभद्रनगर, बाणेर, पुणे) यांनी याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार सागर ओव्हाळ, सुजित गोरख दगडे, गणेश निंबाळकर, ललित पूनमचंद डांगी, विशाल हनुमंत भुंडे, ओंकार लिंगे ऊर्फ सोन्या यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री शिंदे हे पाषाण एनडीए रोडवर असलेल्या एचपी कंपनीच्या पेट्रोलपंपावर पेट्रोल भरत होते. त्यावेळी तिथे आलेल्या आरोपींनी आम्ही गाववाले आहोत, आमच्या वाहनात अगोदर पेट्रोल भर, असे म्हणत रात्री आठ वाजताच्या सुमारास गोंधळ घातला. त्यानंतर पुन्हा रात्री साडेअकरा वाजताच्या सुमारास हातात तलवारी घेऊन परत येत आरडा-ओरडा करीत गोंधळ घातला. आरोपी ओंकार लिंगे याने सुनील बनपट्टे यांच्या अंगावर तलवार घेऊन धावून आला. हाताने आणि लाथा बुक्‍क्‍याने मारहाण करीत ‘पेट्रोलपंप जाळून टाकू’ अशी धमकी दिली. पोलीस उपनिरीक्षक दिवटे तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.