Hinjawadi Crime News : प्रतिबंधित गुटखा विक्रीसाठी घेऊन जाणाऱ्या कारची दुचाकीला धडक; दोघे जखमी

एमपीसी न्यूज – विकेंड लॉकडाऊनच्या कालावधीत प्रतिबंधित गुटखा विक्रीसाठी घेऊन जाणा-या एका कार चालकाने दुचाकीला जोरात धडक दिली. त्यात दुचाकीवरील दोघेजण जखमी झाले. याप्रकरणी कारचालक आणि त्याच्या साथीदाराला पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून कार आणि 78 हजारांचा गुटखा जप्त करण्यात आला आहे.

ही घटना रविवारी (दि. 11) दुपारी मुंबई-बेंगलोर महामार्गावर मुळा नदीच्या पुलाजवळ घडली.

राहुल बाबूजी सर्जीने (वय 31, रा. वरळी), अमर आनंदा सोरटे (वय 25, रा. चेंबूर) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. सुधाकर विठ्ठल पायगुडे (वय 55), कुंदा सुधाकर पायगुडे (वय 50, दोघे रा. केशवनगर, चिंचवड) अशी जखमींची नावे आहेत. याबाबत पोलीस हवालदार विजय राठोड यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

_MPC_DIR_MPU_II

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी कार (एम एच 46 / एन 4377) मधून प्रतिबंधित गुटखा विक्रीसाठी जात होते. रविवारी दुपारी दीड वाजताच्या सुमारास मुंबई-बेंगलोर महामार्गावर मुळा नदीच्या पुलाजवळ आल्यानंतर कार भरधाव वेगात चालवून एका दुचाकीला (एम एच 14 / झेड 3871) जोरात धडक दिली. या अपघातात दुचाकी चालक सुधाकर पायगुडे यांना किरकोळ दुखापत झाली. तर त्यांच्या पत्नी कुंदा पायगुडे यांच्या मणक्याला गंभीर दुखापत झाली.

पोलिसांनी तत्काळ कारवाई करत आरोपींची कार अडवून ताब्यात घेतली. कारमधून 78 हजार 120 रुपये किमतीचा प्रतिबंधित गुटखा होता. पोलिसांनी गुटखा आणी अडीच लाखांची कार जप्त करून दोघांना अटक केली.

हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.