BNR-HDR-TOP-Mobile

Hinjawadi : इंस्टाग्रामवरील मैत्रिणीला भेटायला गेलेल्या तरुणाचे अपहरण अन् सुटका

INA_BLW_TITLE

एमपीसी न्यूज – इंस्टाग्रामवरील एका मैत्रिणीने चॅटिंग करून तरुणाला भेटायला बोलावले. तरुण मैत्रिणीला भेटायला गेला असता अकरा जणांनी मिळून त्याच्या गळ्यातील सोन्याची साखळी हिसकावून त्याचे अपहरण केले. पोलिसांनी तात्काळ सूत्रे हलवून त्याची तासाभरात सुटका केली. हा प्रकार हिंजवडी फेज तीन ते देहूरोड दरम्यान बुधवारी (दि. 12) रात्री नऊच्या सुमारास घडला.

सूरज संजय कोळी (वय 22, रा. आकुर्डी. मूळ रा. करोळे, ता. पंढरपूर, जि. सोलापूर) असे अपहरण आणि सुटका झालेल्या तरुणाचे नाव आहे. त्याने याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार आदित्य कोडगी, गणेश पुरी, वैभव उपाडे, रुतिक जाधव, शुभम वाळके, बाळा लोखंडे, सुप्रिया आव्हाड आणि अन्य चारजण असे एकूण अकरा जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

  • याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सूरज आणि गणेश पुरी या दोघांचे पटत नव्हते. ही गोष्ट सूरज याने त्याचा मित्र मोन्या कदम याला सांगितली. सूरज याने आपल्याशी पटत नसल्याचे मोन्या कदम ला का सांगितले? याचा राग मनात धरून गणेश पुरी आणि त्याच्या साथीदारांनी सुरजच्या अपहरणाचा कट रचला.

त्यानुसार आरोपींनी सुप्रिया आव्हाड या तरुणीच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून सुरज याच्याशी चॅट केली. त्यामध्ये सुप्रियाने सूरजला हिंजवडी फेज तीन येथे टिनेल्स टाऊन सोसायटी येथे भेटण्यासाठी बोलावले. बुधवारी रात्री नऊच्या सुमारास भेटण्याची वेळ ठरली. त्यानुसार सुरज त्याच्या दुचाकीवरून इंस्टाग्राम वरील मैत्रिणीला भेटायला गेला.

  • फेज तीनमधील टिनेल्स टाऊन सोसायटीजवळ सूरज आला असता आदित्य गोडगी याने त्याच्या दुचाकीने सूरजच्या दुचाकीला धक्का दिला. यामध्ये सूरज खाली पडला. गणेश पुरी याने सूरजच्या गळ्यातील साडेतीन तोळ्यांची सोन्याची साखळी जबरदस्तीने हिसकावून घेतली. गणेश पुरी याने त्याच्याकडील गावठी कट्टा सूरजच्या कमरेला लावून जीवे मारण्याची धमकी दिली आणि सर्व आरोपींनी सूरजला मोटारसायकलवर बसवून पळवून नेले.

सूरजच्या मित्राने याबाबतची माहिती पिंपरी-चिंचवड नियंत्रण कक्षाला याबाबत माहिती दिली. सूरजला घेऊन जाताना आरोपींनी काळा खडक असा उल्लेख केल्याचे पोलिसांना सांगितले. त्यानुसार पोलिसांनी सर्व सूत्रे लावली. देहूरोड येथे पोलिसांनी नाकाबंदी केली. यामध्ये पोलिसांनी सर्व आरोपींना अडवून त्यांच्याकडून एक गावठी कट्टा जप्त केला. तसेच सुरजची सुखरूप सुटका केली.

HB_POST_END_FTR-A2

.