Hinjawadi : अचानक ब्रेक लावल्यावरून दुचाकीस्वाराची कॅब चालकाला मारहाण

एमपीसी न्यूज – समोरच्या कारने अचानक ब्रेक लावला. त्यामुळे कॅब चालकाने देखील ब्रेक लावला. यावरून बाजूने जाणा-या दुचाकीस्वाराने कॅब चालकाला शिवीगाळ करत मारहाण केली. ही घटना मंगळवारी (दि. 18) सकाळी अकराच्या सुमारास मुंबई-बेंगलोर महामार्गावर बाणेर येथे घडली.

कॅबचालक संजय विठ्ठल पिंगळे (वय 39, रा. तुंबडे नगर, दहिसर पूर्व) यांनी याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार दुचाकीस्वाराविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

  • याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संजय मंगळवारी सकाळी कॅबमधून प्रवाशांना सोडण्यासाठी बाणेर येथे जात होते. बाणेर फाट्याजवळ आले असता त्यांच्या समोरील एका कारने अचानक ब्रेक लावला. यामुळे संजय यांनाही अचानक ब्रेक लावावा लागला. दोन्ही कार अचानक थांबल्या.

संजय यांच्या कारच्या मागून एक दुचाकीस्वार (एमएच 12 / जी ई 9930) जात होता. संजय यांची कार अचानक थांबली म्हणून दुचाकीस्वाराने त्यांना शिवीगाळ करून हाताने मारहाण केली. यानंतर संजय कारमधील प्रवाशांना सोडण्यासाठी बाणेर येथे गेले. दुचाकीस्वाराने तिथे येऊनही संजय यांना दगडाने मारहाण केली. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.