Hinjawadi : गहाण ठेवण्यासाठी दिलेले पाच लाखांचे दागिने घेऊन महिला पसार

एमपीसी न्यूज – एका महिलेकडे विश्वासाने पाच लाख रुपये किमतीचे दागिने गहाण ठेवण्यासाठी दिले. मात्र, त्या महिलेने दागिने घेऊन धूम ठोकली. ही घटना तापकीरवस्ती, सूसगाव येथे घडली आहे.

इंद्राणी राजू जगताप (वय 39, रा. तापकीरवस्ती, सूसगाव) यांनी याप्रकरणी हिंजवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार रोमा सिंग (रा. वेस्टर्न हिल्स, फेज 2, सूसगाव) या महिला विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, इंद्राणी यांचे पती आर्मीमध्ये जेसीओ पदावर श्रीनगर येथे कार्यरत आहेत. त्यांना सुसगाव येथे एक गुंठा जागा घ्यायची होती. त्यासाठी जागेच्या मालकाला तीन लाख रुपये दिले होते. आणखी सात लाख रुपयांची इंद्राणी यांना व्यवस्था करायची होती. त्या पैशांची व्यवस्था करण्यासाठी त्यांच्याकडे असलेले स्त्रीधन गहाण ठेऊन किंवा विकून तसेच बँकेकडून कर्ज घेऊन पैसे उभा करण्याचे त्यांनी ठरवले होते. याबाबत इंद्राणी यांच्या भाडेकरू महिलेला माहिती होती.

भाडेकरू महिला आरोपी रोमा हिच्या घरी धुणीभांडीचे काम करत होती. दागिने गहाण ठेवण्याची माहिती रोमाला मिळाली. त्यानंतर, रोमा आणि इंद्राणी यांची भाडेकरू महिला इंद्राणी यांच्या घरी आल्या. आर्थिक अडचणींसंदर्भात बोलून, ‘तुमचे दागिने मला द्या, माझ्याकडून पैसे घ्या. गहाण ठेवलेल्या दागिन्यांचे पैसे येईपर्यंत व्याज म्हणून दरमहा तीन हजार रुपये द्या.’ असा प्रस्ताव रोमा हिने इंद्राणी त्यांच्याकडे ठेवला. त्यावेळी त्यांच्यामध्ये कोणताही व्यवहार झाला नाही.

काही दिवसांनी रोमा पुन्हा इंद्राणी यांच्या घरी आली. तिने बँकेतील बॅलन्स दाखवून तसेच तिच्या पतीचे हॉटेल आणि अन्य व्यवसाय असल्याचे सांगितले. तिच्यावर विश्वास ठेऊन इंद्राणी यांनी 2 ऑगस्ट 2019 रोजी दुपारी साडेबाराच्या सुमारास आरोपी रोमासिंग या महिलेला त्यांचे चार लाख 94 हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने गहाण ठेवण्यासाठी दिले. त्याबदल्यात रोमाने बॅंकेचा पाच लाख रुपयांचा धनादेश (चेक) दिला. हा चेक बँकेत जमा केला असता रोमाच्या खात्यावर पैसे नसल्याचे इंद्राणी यांना समजले.

त्यानंतर, इंद्राणी याबाबत विचारण्यासाठी रोमाच्या घरी गेल्या असता तिच्या घराला कुलूप लावलेले दिसले. इंद्राणी यांनी तिला फोनकडून विचारले असता वेगवेगळी कारणे सांगून रोमाने इंद्राणी यांना पैसे देण्याचे टाळले. आरोपी महिलेने इंद्राणी यांचा विश्वासघात करून फसवणूक केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.