BNR-HDR-TOP-Mobile

Hinjawadi : राष्ट्रीय स्केटिंगपटूच्या खूनप्रकरणी आरोपी अटकेत

एमपीसी न्यूज – राष्ट्रीय स्केटिंगपटूचा बिअरच्या बाटलीने गळा चिरून खून करण्यात आला. ही घटना बुधवारी (दि. 4) सकाळी नऊच्या सुमारास मांरुजीतील कोलते पाटील टाऊनशिपच्या मोकळ्या मैदानात उघडकीस आली आहे. याप्रकरणी एकाला हिंजवडी पोलिसांनी अटक केली आहे.

विठ्ठल मानमोडे असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

निलेश शिवाजी नाईक (वय 24, रा. विघ्नहर्ता सोसायटी, सुसगाव, मूळ रा. शाहूनगर, जयसिंगपूर, ता. शिरोळ, कोल्हापूर) असे खून झालेल्या स्केटिंगपटूचे नाव आहे. याप्रकरणी कपिल भूपाल नाईक (वय 34, रा. सुसगाव. मूळ रा. चिंचवाड, ता. शिरोळ, जि. कोल्हापूर) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक यशवंत गवारी यांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी निगडी येथील कॅम्प संपवून मयत निलेश घरी आले. त्यानंतर ते मित्रांबरोबर घराबाहेर गेले. मंगळवारी रात्री आरोपी विठ्ठल याने निलेश यांना मारुंजी येथील कोलते पाटील टाऊनशिपच्या मोकळ्या मैदानात नेऊन भरपूर दारू पाजून त्यांचा मानेवर, गेल्यावर व डोक्यात वार करून खून केला. बुधवारी सकाळी हा प्रकार समोर आला. याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

हिंजवडी पोलिसांना माहिती मिळाली की, आरोपी विठ्ठल नवी मुंबई परिसरातील महामार्गावरील एका हॉटेलमध्ये बसला आहे. त्यानुसार तांत्रिक माहितीच्या आधारे त्याचा पाठलाग करून हिंजवडी पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. खुनाबाबत त्याच्याकडे चौकशी केली असता आरोपी विठ्ठल याने सांगितले की, निलेश हा आपल्या पत्नीला वारंवार मेसेज करीत होता. या रागातून त्याचा खून केला. विठ्ठल हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर चतुःशृंगी आणि वडगाव मावळ पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत.

निलेश नाईक मुळचे कोल्हापूरचे असून ते मागील पाच ते सहा वर्षांपासून आई आणि मोठ्या भावासोबत सुसगाव येथे राहत आहेत. ते गोखलेनगर येथे स्केटींग प्रशिक्षकाचे काम करीत होते. नाईक हे इनलाईन हॉकी खेळत होते. त्यांनी राज्यस्तरावर दोन रौप्य तर एक ब्राँझपदक पटकाविले आहे. तसेच त्यांची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड देखील झाली होती.

ही कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक यशवंत गवारी, पोलीस निरीक्षक (गुन्हे) अजय जोगदंड यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकप्रमुख अनुरुद्ध गिजे, पोलीस कर्मचारी अनंत दळवी, वायबसे, किरण पवार, विजय घाडगे, आथिर्क शेख, हनुमंत कुंभार, कुणाल शिंदे, विवेक गायकवाड, सुभाष गुरव, अमर राणे, झनकसिंग गुमलाडू, श्रीकांत चव्हाण, चंद्रकांत गडदे, विकी कदम, अली शेख यांच्या पथकाने केली.

Advertisement

HB_POST_END_FTR-A3