Hinjawadi : बिअरचा फवारा अंगावर उडाल्याने हॉटेलमधील बाउन्सरकडून ग्राहकाला मारहाण; बाउन्सरला अटक

एमपीसी न्यूज – मित्राचा वाढदिवस साजरा करण्यासाठी हॉटेलमध्ये गेल्यानंतर बिअरचा फवारा हॉटेलमध्ये काम करणा-या बाउन्सरच्या अंगावर उडाला. यामुळे बाउन्सरने ग्राहकाला पाईपने मारले. ही घटना सोमवारी (दि. 2) पहाटे दीडच्या सुमारास हॉटेल एफ एम एल येथे घडली.

शुभम बाळासाहेब कचरे (वय 21, रा. गणराज चौक, बाणेर) असे जखमी ग्राहकाचे नाव आहे. त्यांनी याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पांडुरंग गौतम खोसे (वय 23, रा. शिवकॉलनी, वाकड) असे अटक केलेल्या आरोपी बाउन्सरचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी कचरे आकुर्डी येथील एका खाजगी महाविद्यालयात अभियांत्रिकीच्या शेवटच्या वर्षात शिक्षण घेत आहेत. ते बाणेर येथे त्यांच्या तीन मित्रांसोबत राहतात. सोमवारी रूममधील सुशांत सांगळे या मित्राचा वाढदिवस होता. त्यामुळे वाढदिवस साजरा करण्यासाठी सर्वजण मित्र हिंजवडी-वाकड रोडवरील हॉटेल एफ एम एल मध्ये गेले. आरोपी पांडुरंग हा त्या हॉटेलमध्ये बाउन्सरचे काम करतो. वाढदिवस साजरा करत असताना शॅम्पेन बिअरचा फवारा हवेत उडवत असताना कचरे यांच्याकडून पांडुरंगच्या अंगावर फवारा उडाला.

फवारा उडाल्यामुळे कचरे यांनी आरोपी पांडुरंगची माफी देखील मागितली. त्यानंतर पुन्हा वाढदिवस साजरा करत असताना आरोपीने हॉटेल व्यवस्थापकाला सांगून कचरे आणि त्यांच्या मित्रांना हॉटेलच्या बाहेर काढले. अचानक हॉटेलमधून बाहेर काढल्याने सर्वजण हॉटेलच्या व्यवस्थापकाकडे जात होते. त्यावेळी पांडुरंग याने पुन्हा शिवीगाळ केली. तसेच व्यवस्थापकासोबत बोलत असताना पांडुरंग याने पुन्हा शिवीगाळ करत प्लास्टिक पाईपने कचरे यांना मारहाण केली. यामध्ये कचरे यांच्या मानेला गंभीर दुखापत झाली. तर कचरे यांचे मित्र अक्षद झोंडे  यांच्या उजव्या हातावर मारले.

सुशांत सांगळे यांनी 100 नंबरवर फोन करून पोलीस मदत मागितली. हिंजवडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन कचरे यांना रुग्णालयात उपचारासाठी पाठवले. आरोपी बाउन्सर पांडुरंग याला अटक केली. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.