Hinjawadi : कामाचे पैसे मागणाऱ्या कामगाराला ठेकेदाराने भरदिवसा पेट्रोल ओतून जाळले

कामगार गंभीर जखमी

एमपीसी न्यूज – कामाचे पैसे मागणाऱ्या कामगाराला ठेकेदार आणि त्याच्या साथीदाराने भरदिवसा पेट्रोल ओतून जाळले. यामध्ये कामगार गंभीर जखमी झाला आहे. याप्रकरणी दोन जणांवर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना कात्रज-देहूरोड बाह्यवळण महामार्गावर ताथवडे येथे घडली.

सुभाष विश्वनाथ साह (वय 33, रा. लेबर कॅम्प, ताथवडे. मूळ रा. चकईनायत, ता. जि. वैशाली, बिहार) असे जखमी कामगाराचे नाव आहे. त्याने याप्रकरणी बुधवारी (दि. 19) हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, मोहम्मद अन्वर झुमरातिया (वय 40, रा. तापकीरनगर, पुणे), संतोषकुमार हरकराम (वय 36, रा. ताथवडे) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

_MPC_DIR_MPU_II

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कात्रज-देहूरोड बाह्यवळण महामार्गावर ताथवडे येथे सर्व्हिस रोडच्या बाजूला एका बांधकाम साईट सुरू आहे. त्या साईटवर आरोपी मोहम्मद हा ठेकेदार असून आरोपी संतोषकुमार फोरमन आहे. तर जखमी फिर्यादी हे ठेकेदाराकडे सेंट्रिंगचे काम करत होते. सुभाष यांनी त्यांच्या कामाचे पैसे आरोपी ठेकेदाराकडे वारंवार मागितले.

पैसे मगितल्याच्या रागातून आरोपीने त्याच्या एका साथीदारासोबत मिळून 3 फेब्रुवारी रोजी दुपारी चार वाजता सुभाष यांना ठार मारण्याचा उद्देशाने त्यांच्यावर पेट्रोल ओतले. त्यानंतर माचीसच्या काडीने सुभाष यांना पेटवून दिले. तसेच आरोपीच्या साथीदारांनी सुभाष यांना इंजेक्शन देऊन घडलेली हकीकत न सांगता खोटी हकीकत सांगण्यास भाग पाडले. जखमी सुभाष यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.