Hinjawadi : हिंजवडी, भोसरी एमआयडीसी मधून 32 हजारांचा ऐवज लंपास

एमपीसी न्यूज – हिंजवडी परिसरात घरफोडी आणि जबरी चोरीचे दोन आणि भोसरी एमआयडीसी परिसरात जबरी चोरीच्या गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे. तीन गुन्ह्यात चोरट्यांनी एकूण 32 हजार 40 रुपयांचा ऐवज चोरून नेला.

भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत लांडेवाडी येथे जबरी चोरीचा गुन्हा घडला. मानस कुमार दास (वय 29, रा. मोशी) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली. त्यानुसार दुचाकीवरून आलेल्या तीन चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मानस यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, सोमवारी (दि. 12) दुपारी साडेबाराच्या सुमारास मानस लांडेवाडी मधील ए आर एम कंपनीसमोरून पायी चालत जात होते. त्यावेळी पल्सर दुचाकीवरून आलेल्या तीन जणांनी त्यांचा नऊ हजार रुपये किमतीचा मोबाईल फोन जबरदस्तीने हिसकावून नेला.

हिंजवडी पोलीस ठाण्यात वसीम अक्रम रमजान (वय 22, रा. नुहु, हरियाणा) यांनी फिर्याद दिली. त्यानुसार जावेद ईद्रीस शेख (वय 19, रा. वाकड), सागर सुरेश जगताप (वय 25, रा. थेरगाव) आणि त्यांच्या एका साथीदाराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वसीम त्यांच्या दोन चालक मित्रांसोबत देहूरोड-कात्रज बाह्यवळण मार्गावर पुनावळे येथील गोकुळ हॉटेलसमोर सोमवारी (दि. 12) पहाटे सव्वादोनच्या सुमारास गप्पा मारत बसले होते. त्यावेळी आरोपी जावेद, सागर आणि त्याचा एक साथीदार तिघेजण आले. त्यांनी वसीम आणि त्यांच्या दोन चालक मित्रांकडून जबरदस्तीने 3 हजार 40 रुपये चोरून नेले.

घराच्या खिडकीतून घरात प्रवेश करून अज्ञात चोरट्याने 20 हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेले. ही घटना शनिवारी (दि. 10) पहाटे हिंजवडी मधील मेगा पॉलीस फेज तीन येथे सांगरिया सोसायटीमध्ये घडली. याप्रकरणी प्रणय भागवत सूर्यवंशी (वय 38, रा. हिंजवडी) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.