Hinjawadi : बांधकाम इमारतीवरून पडून पेंटरचा मृत्यू

एमपीसी न्यूज – बांधकाम इमारतीवर पेंटिंगचे काम करणा-या कामगाराचा इमारतीवरून खाली पडून मृत्यू झाला. ही घटना रविवारी (दि. 18) दुपारी चारच्या सुमारास स्वस्तिक मानस गृहप्रकल्प महाळुंगे येथे घडली.

राकेश रामबच्चन बर्मा (वय 25, रा. पाटीलनगर, थेरगाव. मूळ रा. बौरब्यास, संत कबीर नगर, उत्तर प्रदेश) यांनी याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार तुषार पाडाळे (वय 45), विजय बालवडकर (पूर्ण पत्ता माहिती नाही) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राधेश्याम रामबच्चन बर्मा (वय 33) असे मृत्यू झालेल्या कामगाराचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बांधकाम व्यावसायिक तुषार आणि विजय यांची महाळुंगे येथे स्वस्तिक मानस इमारतीचे बांधकाम सुरु आहे. या इमारतीवर राधेश्याम पेंटिंगचे काम करीत होते. बांधकाम व्यावसायिकांनी कामगारांच्या सुरक्षेची काळजी घेऊन त्यांना सेफ्टीबेल्ट, हेल्मेट, रस्सी, ग्लोज यांसारखी कोणतीही सुरक्षा साधने दिली नाहीत. रविवारी दुपारी चारच्या सुमारास पेंटिंगचे काम करताना राधेश्याम इमारतीवरून खाली पडले. यामध्ये त्यांना गंभीर दुखापत झाली. त्यात त्यांचा मृत्यू झाला. यावरून राधेश्याम यांचे भाऊ राकेश यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.