Hinjawadi: पालिका, पोलीस, विमानतळ प्रशासनाच्या हातावर तुरी देऊन कोरोना पॉझिटिव्ह महिला दुबईला पळाली

Hinjawadi: Corona positive woman flees to Dubai महिला पॉझिटिव्ह आल्याची माहिती संबंधित रुग्णालयाने पालिका प्रशासनाला 12 जुलै रोजी दिली. महिलेने होम आयसोलेशनचा पर्याय निवडला.

एमपीसी न्यूज – कोरोना पॉझिटिव्ह असताना एका महिलेने सोसायटीच्या सुरक्षा रक्षकांना चुकीची माहिती देऊन सोसायटीमधून पलायन केले. त्यानंतर महापालिका प्रशासन, पोलीस यंत्रणा आणि शेवटी विमानतळावरील अधिकाऱ्यांना पद्धतशीरपणे चकमा देत तिने विमानप्रवास करून दुबईमधील शारजा शहर गाठले. यामुळे संबंधित प्रशासनाची झोप उडाली आहे. या प्रकारामुळे प्रशासनाची ढिलाई पुन्हा उघडकीस आली आहे.

त्या महिलेने पुनावळ्यातील व्हिजन इंद्रमेघ या सोसायटीमध्ये एक फ्लॅट खरेदी केला होता. फ्लॅटच्या खरेदीची कागदपत्रांची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी ती लॉकडाऊन पूर्वी दुबईहून पुण्यात आली होती.

व्हिजन इंद्रमेघ या सोसायटीमध्ये एकूण 152 सदनिका आहेत. त्यात दोन विंग आहेत. संबंधित महिलेने बी विंगमध्ये सदनिका घेतली आहे. महिला पुण्यात आली आणि भारतात कोरोनामुळे लॉकडाऊन झाले. परदेशातील विमानसेवा बंद झाली. यामुळे महिला पुण्यात अडकून पडली.

चार महिने झाले तरी विमानसेवा सुरू होईना. त्यात कोरोनाचा कहर वाढतच आहे. दरम्यान महिलेला कोरोनाची लागण झाली. 11 जुलै रोजी महिलेने थेरगाव येथील एका खासगी रुग्णालयात कोरोनाची तपासणी केली. त्या महिलेचा तपासणी अहवाल पॉझिटिव्ह असल्याचे निदान झाले.

महिला पॉझिटिव्ह आल्याची माहिती संबंधित रुग्णालयाने महापालिका प्रशासनाला 12 जुलै रोजी दिली. महिलेने होम आयसोलेशनचा पर्याय निवडला आणि तिच्या फ्लॅटमध्ये राहण्याची तिने तयारी केली.

दि. 13 जुलै रोजी महापालिकेच्या वैद्यकीय विभागाच्या पथकाने होम आयसोलेशनची कागदोपत्री प्रक्रिया पूर्ण केली. दरम्यान, प्रशासनाने महिला राहत असलेल्या सोसायटीला कंटेन्मेंट झोन म्हणून जाहीर केले.

जबाबदारी म्हणून सोसायटीच्या अध्यक्षांनी होम आयसोलेशनच्या कागदपत्रांवर स्वाक्षरी केली. सोसायटी कार्यालयातील एक कर्मचारी देखील महिलेच्या सेवेसाठी देण्यात आला. अन्य पदाधिकारीही महिलेची काळजी घेत होते.

दि. 17 जुलैला ती महिला सोसायटीच्या गेटवर आली. तिने सुरक्षारक्षकांना ‘मी मेडिकलमध्ये जाऊन येते’, असे खोटे सांगितले आणि ती बाहेर पडली. बराच वेळ झाला, तरी महिला परत आली नाही. महिला तिच्या फ्लॅटमध्ये नसल्याची माहिती सोसायटीच्या पदाधिका-यांपर्यंत पोहोचली.

सोसायटी पदाधिकाऱ्यांनी सोसायटीच्या गेटवरील नोंदवही तपासली असता त्यात महिलेने सगळी माहिती खोटी दिली होती. बाहेर जाण्याचे कारण मेडिकलला जात असल्याचे सांगितले होते.

सर्वजण महिलेला शोधत असताना सोसायटी पदाधिकाऱ्यांच्या मोबाइलवर मेसेज आला. ‘मी शारजा येथे पोहोचले आहे. माझी कोरोना टेस्ट निगेटिव्ह आली आहे.’

महिलेचा मेसेज वाचून पदाधिकाऱ्यांच्या पायाखालची जमीन सरकली. पदाधिकाऱ्यांनी थेट हिंजवडी पोलीस ठाणे गाठले. पोलिसांना याबाबत माहिती दिली. पोलिसांनी याबाबत चौकशी सुरू केली. मात्र, केली जाणारी धावपळ व्यर्थ होती. सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांनी महापालिकेच्या वैद्यकीय विभागाला देखील याबाबत माहिती दिली.

‘ती महिला आम्हा सर्वांसह सरकार, पोलीस, महापालिका या सर्वांना फसवून पळून गेली आहे. पॉझिटिव्ह असताना तिला विमानाचे तिकीट कसे मिळाले. सोसायटी प्रवेशद्वारावरील नोंद वहीत तिने नाव, फ्लॅट नंबर, संपर्क क्रमांक चुकीचा दिल आहे. कारण, मात्र मेडिकलवर जाते, असे नमूद केले आहे, असे सोसायटी अध्यक्ष आशिष बिरादार म्हणाले.

ती महिला शहरातून विमानतळावर कशी गेली? कोरोनाचे निगेटिव्ह रिपोर्ट कसे मिळवले? विमानतळ अधिकाऱ्यांनी तिला अडवले नाही का? विमानाचे तिकीट तिला कसे मिळाले? असे अनेक प्रश्न अद्याप सोसायटी पदाधिकारी, महापालिका आणि पोलिसांपुढे आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.