Hinjawadi Crime : एटीएममध्ये तांत्रिक छेडछाड करून क्रेडीट कार्डद्वारे 4 लाख 38 हजारांची रक्कम काढली

एमपीसी न्यूज – पैसे काढल्याचा व्यवहार रेकोर्डवर येऊ नये यासाठी अज्ञात दोघांनी एटीएम मध्ये तांत्रिक छेडछाड केली. तसेच क्रेडीट कार्डचा वापर करून मशीनमधून चार लाख 38 हजार रुपये काढून घेत बँकेची फसवणूक केली. ही घटना 29 सप्टेंबर रोजी हिंजवडी येथील कॅनरा बँकेच्या एटीएम मध्ये उघडकीस आली.

बँकेचे मुख्य व्यवस्थापक अतुल राजन श्याम पांडे (वय 36, रा. हिंजवडी) यांनी याबाबत गुरुवारी (दि. 8) हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञातांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 28 सप्टेंबर रोजी सायंकाळी सव्वासात ते पावणे दहा आणि 29 सप्टेंबर रोजी सकाळी पावणेसहा ते पावणे सात या कालावधीत हा प्रकार घडला आहे. शिवाजी चौक, हिंजवडी येथे कॅनरा बँकेचे एटीएम सेंटर आहे. दोन अनोळखी इसमांनी एचडीएफसी बँकेच्या क्रेडीट कार्डचा वापर करून कॅनरा बँकेच्या मशीन मधून पैसे काढण्याची प्रोसेस केली.

झालेला व्यवहार रेकोर्डवर येऊ नये, यासाठी मशीनच्या नेटचे केबल बंद-चालू करून किंवा रिसेट करून मशीनसोबत तांत्रिक छेडछाड केली. मशीन मधून 4 लाख 38 हजार रुपये काढून बँकेची फसवणूक केली. याबाबत बँकेने पोलिसांकडे तक्रार अर्ज केला होता. त्यावरून गुरुवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.