Hinjawadi : फ्लॅटचे वेळेत पझेशन न दिल्याने दोन बांधकाम व्यावसायिकांवर गुन्हा

एमपीसी न्यूज – एका नागरिकाने हिंजवडी येथे सुरु असलेल्या बांधकाम प्रोजेक्टमध्ये फ्लॅट घेतला. फ्लॅट घेताना बांधकाम व्यावसायिकाने बांधकाम पूर्ण करण्याची मुदत ठरवून दिली. नागरिकाने त्यासाठी सुमारे 2 कोटी 29 लाख 84 हजार 200 रुपये दिले. मात्र, बांधकाम व्यावसायिकाने दिलेल्या वेळेत बांधकाम पूर्ण केले नाही. याबाबत ग्राहक नागरिकाने पोलिसात धाव घेत दोन बांधकाम व्यावसायिकांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. हा प्रकार हिंजवडी जवळ बावधन खुर्द येथे घडला.

रणजित हेमचंद्र ओक (वय 46, रा. पाषाण रोड, पुणे) यांनी याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार मार्व्हल ओमेगा बिल्डर्स प्रा. लि.चे संचालक विश्वजित झंवर आणि महेश बन्सीलाल लड्डा यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

  • याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मार्व्हल ओमेगा या बांधकाम कंपनीची बावधन खुर्द येथे मार्व्हल सेल्हा रिज इस्टेट ही बांधकाम साईट सुरु आहे. त्या प्रोजेक्टमध्ये रणजित यांनी 2013 साली 432.05 चौरस फुटांचा एक फ्लॅट खरेदी केला. त्यासाठी रणजित यांनी बांधकाम व्यावसायिकाला 2 कोटी 29 लाख 84 हजार 200 रुपये दिले.

रणजित यांनी बावधन खुर्द येथील बांधकामासाठी दिलेले पैसे बांधकाम व्यवसायिकाने इथे न वापरता दुसरीकडे वापरले. त्यामुळे बांधकाम व्यावसायिकाने दिलेल्या मुदतीत रणजित यांना फ्लॅटचा ताबा मिळाला नाही. यावरून रणजित यांनी बांधकाम व्यावसायिकांवर फसवणुकीचा गुन्हा नोंदवला. हिंजवडी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.