Hinjawadi Crime : 27 लाख 57 हजार रुपयांच्या फसवणूकप्रकरणी कंपनी मालकावर गुन्हा

एमपीसी न्यूज – इलेक्ट्रिकल वस्तूंची ऑर्डर देऊन साहित्य मागवून घेतले. त्या वस्तूंचे पैसे देण्यासाठी दिलेला धनादेश वटला नाही. हा प्रकार एका कंपनी मालकाने तीन जणांसोबत केला. कंपनी मालकाने तीन जणांची मिळून 27 लाख 57 हजार 701 रुपयांची फसवणूक केली. त्यानंतर कंपनी मालक त्याच्या ऑफिसला कुलूप लावून फोन बंद करून पळून गेला. याबाबत कंपनी मालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भद्रेश वर्दे असे गुन्हा दाखल झालेल्या कंपनी मालकाचे नाव आहे. याबाबत योगेश्वर शिवाजीराव सूर्यवंशी (वय 31, रा. धायरी, पुणे) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी भद्रे याने 10 फेब्रुवारी ते 22 फेब्रुवारी 2020 या कालावधीत त्याच्या टेक्नो इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग कंपनीसाठी फिर्यादी योगेश्वर यांच्याकडे इलेक्ट्रिकच्या वायर, कॉइल देण्यासाठी 8 लाख 43 हजार 796 रुपयांची ऑर्डर दिली. दिलेल्या ऑर्डर प्रमाणे फिर्यादी योगेश्वर यांनी आरोपीच्या कंपनीत साहित्य पोहोचवले. त्या मालाचे पैसे देण्यासाठी आरोपीने फिर्यादी यांना धनादेश दिला. तो धनादेश बाउन्स झाला.

हाच प्रकार योगेश शंकर राऊत यांच्यासोबत देखील घडला आहे. आरोपीने योगेश राऊत यांना आठ लाख 47 हजार 990 रुपयांचा दिलेला धनादेश बाउन्स झाला.

तसेच शंकर शरण बसवेश्वर रुमी यांना देखील आरोपीने दहा लाख 65 हजार 915 रुपयांचा धनादेश दिला होता. तो धनादेश देखील बाउन्स झाला. वरील तिन्ही प्रकरणात मिळून आरोपीने 27 लाख 57 हजार 701 रुपयांची फसवणूक केली. त्यानंतर फोन बंद करून कंपनीच्या ऑफिसला कुलूप लावून आरोपी पळून गेला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.