Hinjawadi Crime : पुजा-याला कोंडून मंदिराच्या परिसरातील झाडांवर फिरवला जेसीबी

एमपीसी न्यूज – मुंबई-बंगळूर महामार्गालगत असलेल्या ताथवडे गायरानातील ग्रामदैवत वाघजाई देवी मंदिराच्या पुजाऱ्याला कोंडून ठेऊन मंदिराच्या परिसरातील झाडांवर जेसीबी फिरवून झाडांचे नुकसान केले. ही घटना 8 ऑक्टोबर रोजी सकाळी साडेसहा ते साडेसात या कालावधीत घडली.

महंत तुळशीगिरी महाराज नागासाधूबाबा (वय 90, रा. ताथवडे, ता. मुळशी) यांनी याबाबत बुधवारी (दि. 14) हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी एका बांधकाम व्यावसायिकाच्या दोन ते तीन बाउन्सर (नाव पत्ता माहिती नाही) विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तुळशीगिरी महाराज वाघजाई मंदिरात पुजाअर्चा करतात. 8 ऑक्टोबर रोजी सकाळी त्यांनी पूजा करून मंदिराच्या शेजारी असलेल्या ध्यान खोलीत साधनेला बसले. त्यावेळी एका बांधकाम व्यावसायिकाच्या दोन ते तीन बाउन्सरने येऊन फिर्यादी यांना खोलीत कोंडून टाकले.

त्यानंतर आरोपींनी मंदिराच्या परिसरात फिर्यादी यांनी लावलेली ज्वारी, बाजरीच्या पिकावरून तसेच काही झाडांवरून जेसीबी फिरवून त्यांचे नुकसान केले. नाथ महाराजांना बोलवून फिर्यादी यांनी त्यांची सुटका करून घेतली. त्यानंतर फिर्यादी हे आरोपींना जाब विचारण्यासाठी गेले असता आरोपींनी त्याना ढकलून देऊन शिवीगाळ केली. तसेच जीवे मारण्याची धमकी दिली. यामध्ये फिर्यादी जखमी झाले आहेत. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.