Hinjawadi Crime News : ठेकेदाराचा खून करुन पसार झालेला आरोपी ‘युपी’च्या नक्षलग्रस्त भागातून जेरबंद; एटीएमच्या लोकेशनवरून केली अटक

हिंजवडी पोलिसांची कामगिरी ; छठपुजेसाठी सुट्टी न दिल्याने आरोपी कामगाराने केला होता ठेकेदाराचा खून

एमपीसी न्यूज – छठपुजेला गावाला जाण्यासाठी सुट्टी न दिल्याने ठेकेदाराचा खून करून पसार झालेल्या आरोपीला उत्तर प्रदेशमधील नक्षलग्रस्त भागात शोधमोहीम राबवून अटक करण्यात हिंजवडी पोलिसांना यश आले आहे. विशेष म्हणजे आरोपीबाबत कोणतेही धागेदोरे हाती लागलेले नसताना केवळ एटीएमच्या लोकेशनवरुन  पोलिसांनी अवघ्या आठ दिवसांत आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत.

अरविंद नैपाल चौहान उर्फ यादव (बय 35, रा. देवरीकलान, मडीहान, मिर्झापूर, उत्तर प्रदेश) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. तर, गणपत सदाशिव सांगळे, असे खून झालेल्या ठेकेदाराचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बांधकाम ठेकेदार गणपत सदाशिव सांगळे यांचा खून करून आरोपी चौहान पसार झाला होता. 24 नोव्हेंबर रोजी दुपारी जांभे येथे सांगळे यांचा मृतदेह आढळून आला होता. त्यांच्यासमवेत राहणारा चौहान तेथे नसल्याने त्याच्यावर संशय व्यक्‍त करण्यात आला. तो उत्तर प्रदेश येथे लपला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

मात्र, त्याच्याबाबत कोणतीही अधिक माहिती पोलिसांना मिळत नव्हती. आरोपीचे इंदापूर तालुक्यातील लासुर्णे येथे एका बँकेत खाते असल्याची माहिती पोलिसांच्या हाती आली. त्यानुसार त्याच्या एटीएममधून ठराविक रक्कम काढली जात होती.

खुनाची घटना घडल्यानंतर मारुंजी, अकोला आणि इलाहाबाद येथील एटीएममधून पैसे काढल्याचे समजले. त्यानुसार हिंजवडी पोलिसांचे पथक इलाहाबादला पोहोचले.

त्यावेळी पत्नीसह पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या आरोपी चौहान याला सहाय्यक पोलिस निरीक्षक सागर काटे यांच्या मार्गदर्शनाखाली कर्मचारी महेश वायबसे, बाळकृष्ण शिंदे, हनुमंत कुंभार, आकाश पांढरे आदींनी स्थानिक पोलिसांच्या मदतीने  मडीहान पोलीस ठाण्याच्या हद्दीत जेरबंद केला. हा परिसर नक्षलग्रस्त भाग म्हणून ओळखला जातो.

पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश, अप्पर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे,गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त सुधीर हिरेमठ, आनंद भोईटे, सहायक पोलीस आयुक्त गणेश बिरादार,  हिंजवडीचे वरिष्ठ निरीक्षक बाळकृष्ण सावंत, निरीक्षक अजय जोगदंड, उपनिरीक्षक नंदराज गभाले यांच्या मार्गदर्शनाखाली बंडू मारणे, किरण पवार, आतिक शेख, रितेश कोळी, चंद्रकांत गडदे यांच्या पथकाने ही कामगिरी केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.