Hinjawadi Crime News : आर्थिक कारणावरून मारहाण; परस्पर विरोधात गुन्हे दाखल

एमपीसी न्यूज – आर्थिक देवाण-घेवाणीच्या कारणावरून दोन गटात मारहाण झाली. याबाबत परस्परविरोधी गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे. ही घटना शनिवारी (दि. 10) दुपारी पावणे चार वाजताच्या सुमारास कीर्ती गेटजवळ मारुंजी येथील न्यू बालाजी ट्रेडर्स या किराणा मालाच्या दुकानासमोर घडली.

धनाभाई रवाजी रबारी (वय 42, रा. इंद्रायणीनगर, एमआयडीसी भोसरी) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार शंकरारामजी देवासी (वय 25), नेमारामजी सोमताराम देवासी (वय 25, दोघे रा. मारुंजी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी भागीदारीच्या पैशांच्या देवाणघेवाणीच्या कारणावरून तेजाजी या व्यक्तीसोबत वाद घातला. फिर्यादी यांच्यासमक्ष तेजाजी यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच नेमाराम याने दुकानातील लोखंडी गज तेजाजी यांच्या डोक्यात मारून गंभीर दुखापत केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली आहे.

याच्या परस्पर विरोधात नेमाराम सोमताराम देवासी यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार तेजाराम जेठाराम देसाई, दलपत, धनाराम, मनोजकुमार, नर्सी, तेजाराम देसाई, ईश्वर, राहुल, परबत पुर्ण नाव पत्ता माहिती नाही यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी दुपारी पावणे चार वाजता आरोपी तेजाराम फिर्यादी यांच्या किराणा दुकानावर आलि. त्याने भागीदारीच्या पैशांची मागणी केली. फिर्यादी यांनी यापूर्वीच त्याला पैसे दिले होते. तरीही आरोपी पैसे मागत होता. फिर्यादी यांनी पुन्हा पैसे दिले नसल्याच्या रागातून आरोपी तेजाराम आणि त्याच्या साथीदारांनी फिर्यादी यांच्या दुकानातील साहित्य टेम्पोत भरायला सुरुवात केली.

त्यावेळी फिर्यादी यांच्या भावाने आरोपींना विरोध केला असता आरोपींनी त्याला मारहाण केली. काही वेळाने फिर्यादी दुकानावर आले असता फिर्यादी भांडण सोडवण्यासाठी मध्ये आले. त्यावेळी आरोपींनी फिर्यादी यांना देखील मारहाण केली. आरोपी तेजराम याने फिर्यादी यांच्या हातातील लोखंडी गज हिसकावून घेतला. त्या गजाने मारहाण केली. तसेच डाव्या खांद्याचा चावा घेऊन जखमी केले. वरील दोन्ही गुन्ह्यांचा तपास हिंजवडी पोलीस करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.