Hinjawadi Crime News : ‘माथाडी’च्या नावाखाली खंडणी मागणाऱ्या दोघांवर गुन्हा

एमपीसी न्यूज – कंपनीत मटेरियल खाली करण्यासाठी तसेच मटेरियल भरण्यासाठी येणा-या वाहन चालकांकडून हजारो रुपयांची खंडणी मागणा-या दोघांच्या विरोधात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झालेल्या दोघांनी एका व्यावसायिकाकडे त्याचे दोन कंटेनर खाली करण्यासाठी माथाडी संघटनेच्या नावाखाली प्रत्येकी सहा हजारांची खंडणी मागितली होती.

संतोष ज्ञानू सावंत (वय 44, रा. तळेगाव दाभाडे) यांनी याबाबत हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अमृत वळवे, रामनारायण पारखी (दोघे रा. माण, ता. मुळशी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सावंत यांच्या दोन कंटेनर गाड्या हिंजवडी येथील डसॉल्ट कंपनीत मंगळवारी (दि. 30) दुपारी सव्वाबारा वाजता मटेरियल खाली करण्यासाठी आल्या होत्या. त्यावेळी आरोपीने फिर्यादी यांना फोन करून सांगितले की, ‘मी अमृत वळवे बोलतोय. तुमच्या गाड्या खाली होण्यासाठी कंपनीत आलेल्या आहेत. मी व रामनारायण पारखी याने गाड्या थांबवलेल्या आहेत. तुम्हाला प्रत्येक गाडीमागे सहा हजार रुपये द्यावे लागितलं. त्याशिवाय तुमच्या गाड्या खाली होऊ देणार नाही.’

आरोपींचा कसलाही संबंध नसताना त्यांनी माथाडी संघटनेच्या नावाखाली जबरदस्तीने, मारण्याची धमकी देऊन पैशांची मागणी केली. तसेच फिर्यादी यांचे कंटेनर आरोपी लोड अथवा अनलोड करून देत नसल्याचेही फिर्यादीत म्हटले आहे.

हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.